
वाळूज महानगर, (ता.6) – मतिमंद असलेली आई घरी न आल्याने तिला शोधण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय चिमुकलीला एका अधेड वर्षीय नराधमाने गळा घोटून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. वाळूज येथे शुक्रवारी (ता.1) सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर घडलेली ही अत्यंत खळखळजनक घटना मंगळवारी (ता.5) रोजी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 10 वर्षीय चिमुकलीचे वडील मयत झाले असून आई मतिमंद आहे. त्यामुळे पीडित चिमुकली ही मतीमंद आईसह आजोबाच्या घरी राहते. आई मतिमंद असल्यामुळे ती गावात फिरत असते. शुक्रवारी (ता.1) सप्टेंबर रोजी पीडित चिमुकली आईला शोधत असताना रात्री 8 वाजेच्या सुमारास वाळूज येथील कमळापूर कमानीजवळ आरोपी दिलीप वाघिल्या पवार हा भेटला. त्याने तिला विचारले असता तिने सांगितले की, मी आईला शोधते. त्यामुळे तो तिला म्हणाला की, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला शोधू. त्यानंतर चिमुकलीच्या आईला पंढरपूर येथून शोधून वाळूज येथे येत असताना रस्त्यातील एका टपरीजवळ ते झोपले. रात्री अंदाजे 1.30 वाजेच्या सुमारास आरोपीने 10 वर्षीय चिमुकलीला गळा घोटून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र तिच्या वागण्या बोलण्यावरून संशय आल्याने तिच्या नातेवाईकांनी चिमुकलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बलात्काराचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.5) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढोले करीत आहे.
