वाळूजमहानगर, (ता.27) :- तुर्काबाद (खराडी) येथील एकनाथ नगरात अज्ञात चोराट्यांनी बंद घराचा कडी कोंडा तोडून कपाटात ठेवलेल्या रोख रक्कमेसह सोन्या चांदीच्या दागीने मिळुन जवळजवळ दोन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (ता.27) रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीसांनी सांगितले की, तुर्काबाद (खराडी) येथील मलकापूर रोडवरील एकनाथनगर येथे शेतकरी लक्ष्मण रावसाहेब औताडे हे दोन मुले, सुना, आई, पत्नी समवेत राहुन शेती करतात. घटनेच्या दिवशी दोन्ही सुना माहेरी लग्नाच्या निमित्ताने गेल्या होत्या. तर मुलगा काकासाहेब हा हर्सुलला हळदीच्या समारंभासाठी गेला होता. त्यामुळे घरी लक्ष्मण औताडे, मुलगा संदीप, आई पत्नी असे एकाच रूम मध्ये झोपले होते. त्यामुळे शेजारील रूमला बाहेरून कुलूप लावलेले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोराट्यांनी सोमवारी (ता.27) रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घराच्या पाठीमागून येऊन घराचा कडी कोंडा तोडला. व आतील सामान अस्ताव्यस्त करुन कपाटातून रोख रक्कम व सोन्याचा राणीहार तसेच इतर दाग दागिने मिळून एकुण 1 लाख 99 हजार 100 रुपयाचा ऐवज लंपास केला.
पत्र्याचा आवाज येताच लक्ष्मण औताडे यांना जाग आली. त्यामुळे त्यांनी मुलगा संदीपला आवाज दिला. हातात काठी घेत संदीपसह औताडे हे बाहेर आले. त्याचवेळी समोर राहणारे सुभाष पाटील यांनी फोन करून सांगितले की, तुमचे दार उघडे आहे. घरात बघीतले असता चोरीचा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू सानप आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले, पण माघ निघला नाही. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात लक्ष्मण औताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण बुटटे करीत आहे.
दुसरा प्रयत्न फसला –
लक्ष्मण औताडे यांच्या घरी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा गावाजवळ असलेल्या पांडुरंग जाधव यांच्या घराकडे वळवला. घरासमोर लावलेले विद्युत बल्ब चोरट्यांनी बंद करून अंधार केला. पांडुरंग जाधव हे उठले त्यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांना पाच जण दिसले. त्यातील एकाच्या तोंडाला मास्क तर दुसऱ्याच्या डोक्याला रुमाल गुंडाळलेला होता. अन्य तिघेजण बाजूला उभे होते. कोण आहे रे? असे त्यांनी विचारतात चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे येथे चोरीचा डाव फसला.
