
वाळूजमहानगर (ता. 6) :- गेल्या निवडणुकीत सहा महिन्यात कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सहा महिनेच काय आठ वर्षांतही कारखाना सुरू केला नाही. तालुक्यात एकही काम पूर्ण नाही, फक्त आश्वासन देऊन पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणं एवढेच आमदारांनी केले. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांनी आमदार प्रशांत बंब यांच्यावर केला.
गंगापूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूकीच्या प्रचार सभेत डोमेगाव येथे दिलीप पाटील बनकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, एमआयडीसीच्या जवळ आपले गाव आहे. कोणत्याही कारखान्यात एकाही तरुणाला काम दिले नाही? गेल्या बारा वर्षापासून तालुक्यात केवळ आश्वासनच मिळत आहे. एकही काम पूर्ण झालेले नाही. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांनी करून या निवडणुकीत शिवशाही शेतकरी विकास पॅनलला निवडून द्या. कारखाना आम्ही चालू करून दाखऊ. असे आश्वासन दिले. यावेळी कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण भाऊ सांगळे, विद्यमान संचालक कचरू पाटील शिंदे, शिवराईचे तुकाराम दादा कुंजर, सुरेश मनाळ, शेख अल्लाबक्ष, मधुकर साळुंके, शेषराव साळुंके, शेषराव पाटेकर, कारभारी गायके,
दादासाहेब जगताप, नामदेव दारुंटे, देवचंद राजपूत आदीसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
