वाळूजमहानगर, (ता.23) – तलाठी सज्जा येते तलाठ्यांची थांबण्याची वेळ व वार निश्चित नसल्याने अनेक गावांमधील शेतकरी, कामगार, लाभार्थी, विद्यार्थी यांचे विविध कामे खोळंबली आहे. त्यामुळे तलाठी सज्जा येथे तलाठी थांबण्याचे वार व वेळ निश्चित करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत घाणेगाव येथील सोपान त्रिंबक सातपुते यांनी तहसीलदारांना दिलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, तलाठी सज्जा कासोडा अंतर्गत घाणेगाव, इटावा, एकलहेरा, कासोडा या महसुली गावात तलाठी थांबण्याचे साप्ताहिक वार आणि वेळ निश्चित नाही. सज्जा अंतर्गत गावातील शेतकरी, कामगार, लाभार्थी, विद्यार्थी यांचे तलाठ्याशी सततचे विविध कामे असतात. मात्र तलाठी कार्यालयात असण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे अनेकांना तलाठ्याची वाट पहात बसावे लागते. गैरसोय होते. यात त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. शिवाय काम होण्यास महिन्याचा कालावधी सुद्धा उलटून जातो. त्यामुळे शेतकरी, कामगार, लाभार्थी, विद्यार्थी यांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी आपल्या स्तरावर तलाठी यांचे सज्जा अंतर्गत गावात थांबण्याचे ठिकाण, गावाचे नाव आणि वेळ निश्चित करून अधिकृत पत्र द्यावे. अशी मागणी सोपान सातपुते यांनी केली आहे.
