February 5, 2026

वाळूज महानगर –
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत ढोल ताशाच्या गजरात व बँड पथकाच्या मंगलमय सुरात वाळुज परिसरातील गणेश भक्तांनी मंगळवारी (ता.31) रोजी गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते.

गणेश उत्सवाला मंगळवारी (ता.31) ऑगस्टपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गणपती उत्सवामुळे वाळूज परिसरात विविध ठिकाणी आकर्षक गणेश मूर्तीसह ढोल, ताशे व सजावटीच्या साहित्याने दुकाने सजली होती. मंगळवारी श्री गणेश चतुर्थी असल्याने सकाळपासूनच सर्वत्र गणरायाच्यास्वागताची लगबग सुरू होती. वाळूज परिसरातील बजाजनगर, रांजणगाव (शेणपुंजी), जोगेश्वरी, वाळूज, पंढरपूर, वळदगाव, वडगाव (को.), साजापूर, करोडी, विटावा, घाणेगाव या परिसरातील गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात व बँड पथकाच्या मंगलमय सुरात गणेशाचे स्वागत केले.

व्यापारी गणेश मंडळ बजाजनगर

 

बजाजनगर येथील व्यापारी गणेश मंडळाच्या वतीने महाराणा प्रताप चौकात श्री गणेशाची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना केली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. असा जयघोष करत व्यापारी संघटनेच्या वतीने मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत केले.

वाळूज गणेश महासंघात श्रींची मूर्ती विराजमान

 

वाळूज महासंघात श्रींच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढून प्रतिस्थापना करण्यात आली. वाळूज जिल्हापरिषद शाळा सोनारगल्ली, जीवनलाल पाटणी प्रवेशव्दारमार्गे महासंघाच्या कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महासंघातील पदाधिकारी यांनी ढोल वाजवण्यासाठी सहभागी होत मुलांसोबत स्वतः ढोल वाजवत श्रींची मूर्ती कार्यालयात आणली. तसेच दिवसभरातील श्रींची मूर्ती स्थापन करणाऱ्या व लेझीम पथकांचा महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.

अकरा किलो चांदीची मूर्ती

 

वाळूज येथे वरद गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. दरवर्षी या मूर्तीच्या वजनात वाढ होत असते. यावर्षी वरद गणेश मंडळाच्या मूर्तीचे वजन 11 किलो आहे. या मूर्तीची वाळूज मधून बँड पथकाच्या मंगलमय सुरात व गणरायाचा जयघोष करत मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विधिवत या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

श्री गजानन महाराज गणेश मंडळाची स्थापना

शिवाजीनगर वाळूज येथील कलानगर येथे पहिल्यांदाच श्री गजानन महाराज गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून गणरायाचा जय घोष करत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. वाळूज येथील रामराई कॉर्नर येथून या मूर्तीची सहवाद्य मिरवणूक काढून गणरायाचा जयघोष करत श्री गजानन महाराज मंदिरात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने आकर्षक लाइटिंग, सडा,रांगोळी काढण्यात आली होती.

पर्यावरण पूरक गणेश मूर्ती

शिवाजीनगर वाळूज येथील पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बसविण्यात आली

गणेश उत्सव निमित्ताने वाळूज येथील शिवाजीनगर परीसरात सामाजिक कार्यकर्ते सुरेश केरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखा उपक्रम राबवत श्री ची प्रतिष्ठापना केली. यावरून पूरक अशी छोट्या बालंकानी गणरायाचे अगदी स्वताहाच्या मेहनतीने मुर्ती बनविली आणि आणि मोठ्या उत्साहात श्री गणरायाचे स्वागत केले. या उपक्रमाचे परीसरातील नागरीक खुप खुप कौतुक करत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *