
वाळूज महानगर, (ता.29) – लुटमार करण्याच्या उद्देशाने दोन अज्ञातांनी ट्रॅव्हल बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. चालकाला चाकूचा धाक दाखवत खिशातील रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर बसमधील प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असतानाच गस्तीवरील पोलीस घटनास्थळी आले. त्यामुळे आरोपींचा ट्रॅव्हल लुटण्याचा प्रयत्न फसला. वाळूज पोलीस ठाण्याच्या रात्रगस्तीवरील पथकाने ही कारवाई शनिवारी (ता.29) रोजी पहाटे 3.30 ते 4 वाजेच्या दरम्यान चिकठाण शिवारात केली. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
शनिवारी (ता.29) रोजी पहाटे 3.30 ते 03.55 वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवर जाणा-या संजय ट्रॅव्हल्स नागपुर यांची मुंबई ते नागपुर ही ट्रॅव्हल्स बस व खुराणा ट्रॅव्हल्सची पुणे ते हिंगोली जाणारी ट्रॅव्हल्स बसवर दगडफेक करून दोन अज्ञातांनी काचा फोडल्या. बस थांबताच चालकाला चाकु दाखवुन त्यांच्या जवळील रोख 200 रूपये बळजबरीने काढुन घेतले. त्यानंतर बसमधील प्रवाशांना लुटण्याच्या इराद्यात असतानाच वाळुज पोलीस ठाण्याचे रात्रीच्या गस्तीवरील सपोनि. अमोल ढोले व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. जिकठाण फाट्याजवळ सिनेस्टाईलरित्या ट्रॅव्हल बस लुटण्याच्हाया या थरारक घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेतले. त्यामुळे बस मधील प्रवाशांचा लाखमोलाचा ऐवज बचावला. 
रात्रीच्या गस्तीमुळे प्रवाशांची लूटमार टळली –
वाळुज पोलीस ठाण्याच्या हददीत माहामार्ग असल्याने त्याठिकाणी रोड रॉबरी होते. हे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रोडवर गुन्हे घडण्याच्या वेळेत पेटोलिंग सतर्क ठेवली. जिकठाण फाट्यावर ट्रॅव्हल बस लुटण्याची घटना घडल्यानंतर रात्रगस्तीवरील सपोनि. अमोल ढोले, शाम जगताप, विकास जाधव हे पोहचले व त्यांनी आरोपींना जागीच दबोचले. त्यामुळे या दोन्ही ट्रॅव्हल बस मधील प्रवाशांची लूटमार टळली. 
अतिश अशोक पवार वय 22 वर्ष व अक्षय नागदा भोसले वय-21 वर्ष, दोन्ही रा. नवापूरवाडी ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडुन गुन्हा करण्यासाठी वापरलेला चाकु, कटर, हॅण्डग्लोज असे साहित्य जप्त करण्यात आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त दिपक गि-हे, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळूज ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस ए दिलवाले करीत आहे.
