वाळुज महानगर (ता.6):- महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वाळूज तर्फे कार्यक्षेत्रातील टेंभापूरी येथे आर्थिक समावेशनाद्वारे सक्षमीकरण या केंद्र शासन पुरस्कृत पथदर्शी मोहीमअंतर्गत जनजागरण मेळावा शनिवारी (ता.5) रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाखाव्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी आर्थिक समावेशन व वित्तीय समावेशनाचे महत्व व त्यामागे असलेल्या शासन दृष्टिकोन या विषयीची माहिती सविस्तर विषद केली.
देशभरातून निवडक 8 जिल्ह्यांपैकी औरंगाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सर्व शाखांमध्ये ही मोहीम अतिशय प्रभावीपणे राबवल्या जात असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून ही मोहीम यशस्वी करण्याचा संपूर्ण प्रयत्न बँक करत असल्याबद्दल बँकेच्या मुख्य कार्यालयातील कर्जविभाग प्रमुख सुहास संगमकर यांनी आपल्या ऊपस्थितीत सर्व ग्रामस्थ, शेतकरी व महिलांना सांगितले. शाखाव्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी देशविकास प्रक्रियेत प्रत्येक महिला, नागरिक व शेतकर्याने बँकेत बचत खाते उघडून आर्थिक समावेशनाची मोहीम यशस्वी करण्याचे सर्वांना आवाहन केले. यावेळी शाखाव्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटलपेंशन योजना, रूपे कार्ड व आरोग्य विमा योजना. अशा विविध विमा योजनांची माहिती ऊपस्थितांना दिली. आधार सिडिंग व मोबाईल लिंकिंग करून वेगाने बदलणार्या तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर सर्व बचत खातेदारांनी करून आपल्या कुटुंबाची आर्थिक ऊन्नती व संरक्षण केले पाहिजे. असे आवाहनही शाखाव्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी केले. संतोष खवले, हनमंत ढोले, अनिल खवले, संजय एकनाथ राऊत, गणेश साबळे व बँक मित्र धनंजय कुळकर्णी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.