वाळूजमहानगर (ता.22) – ग्रामपंचायत सदस्यांमधील बेपनावामुळे निर्माण झालेल्या जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या राजकारणी महानाट्यावर काही केल्या पडदा पडेना. अनेक घटना घडामोडीच्या अंकानंतर अविश्वास ठराव पास झाल्याचा अंक संपला. आणि या महानाट्यावर पडदा पडला. असे वाटत असतानाच अविश्वास ठरावाविरुद्ध सरपंचाने अपील केल्याने जोगेश्वरी ग्रामपंचायतच्या महानाट्याचा पडदा बंद होता होता अचानक उघडला. त्यामुळे परिसरात चर्चेला ऊत आले आहे.
वाळुज परिसरातील पाच गावाची मिळून जोगेश्वरीची ग्रुप ग्रामपंचायत आहे. 17 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गजानन बोंबले तर उपसरपंचपदी प्रवीण दुबिले हे दोन्हीही शिवसेनेचे होते. मात्र 13 सदस्यांनी सरपंच व उपसरपंच यांच्यावर मनमानी कारभार व भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत अविश्वास ठरावाच्या दिशेने वाट धरली. आणि जोगेश्वरी राजकारणाच्या महानाट्याला सुरुवात झाली. दरम्यान एकमेकांवर कुरघोडी, अपहरण एवढेच नव्हे तर पोलीस ठाण्यात पर्यंत हे महानाट्य गेले. दरम्यान 10 फेब्रुवारी रोजी अविश्वास ठराव दाखल केला. आणि तो 16 फेब्रुवारी रोजी बहुमताने पास झाला. त्यामुळे सुमारे चार महिने म्हणजेच 120 दिवस जोगेश्वरी, वाळूज, नायगाव- बकवालनगर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर व जळगाव जिल्हा अशा विविध ठिकाणी रंगलेल्या या महानाट्यावर पडदा पडला असे वाटत असतानाच अचानक पडदा उघडला.
आणि अविश्वास ठरावाची नोटीसच मिळाली नाही. असा दावा करत सरपंच गजानन बोंबले यांनी पारित झालेल्या अविश्वास ठरावाविरुद्ध अपील केले. तर इकडे अविश्वास ठराव दाखल करणारे 13 ग्रामपंचायत सदस्य नवीन सरपंच निवडीच्या तारखेच्या वाट पाहत होते. मात्र त्यांना सरपंच निवडीची तारीख मिळण्याऐवजी या प्रकरणात अपील केल्याचे कळले. त्यानंतर अविश्वास ठरावाच्या बाजूने असलेल्या योगेश दळवी, प्रभाकर काजळे, प्रवीण थोरात, अनिल वाघ, नजीरखाँ पठाण, शीला सुरेश वाघमारे, संगीता गणेश ठोकळ, रुक्मिणी कृष्णा काजळे, योगिता रामेश्वर आरगडे, मीना पंडित पनाड, हिरा विलास सौदागर, भारती गणेश साबळे, शाईन मोईस शेख. या 13 जणांनी मंगळवारी (ता.21) मार्च रोजी तहसील कार्यालयात धाव घेत सरपंच गजानन बोंबले यांनी कट, कारस्थान केल्याचा आरोप करत या प्रकरणात दोषींवर कारवाई करून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. दरम्यान जोगेश्वरीचे सरपंच गजानन कारभारी बोंबले यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
तहसीलदारांचा शेरा –
सदरील तक्रार अर्जाच्या अनुषंगाने तलाठी रांजणगाव यांचा नोटीस तामील कशा प्रकारे केल्या. याबाबत अहवाल द्यावा. तसेच तक्रारीत नमूद मुद्द्यानुसार संबंधित गजानन कारभारी बोंबले यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केले असल्यास तलाठी यांनी त्यांचे विरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करावा.
तलाठी म्हणतात मी नवीन आहे –
याबाबत रांजणगाव (शेणपुंजी) सज्जायाचे तलाठी गवळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी नवीन आहे. माझा पहिलाच दिवस असताना मला नोटीस बजवण्याचे सांगितले. त्यानुसार मी नोटीस बजावली आहे. होऊ शकते की, प्रकरण घडवून आणले, माझी फसवणूक झाली. किंवा सरपंच बोंबले यांना या प्रकरणात अपील करण्यासाठी कारण म्हणून काहीतरी चूक दाखवायची म्हणून त्यांनी अपील मिळाले नसल्याचे कारण सांगितले असावे.
