March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.1) – एमआयडीसीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आल्याने जोगेश्वरीत भिषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सोमवारी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत 10 टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात यावा. यासाठी प्रस्ताव पारित करण्यात आला.
वाळूज परिसरातील जोगेश्वरी, रांजणगाव, वाळूज, पंढरपूर, वडगाव-बजाजनगर आदी ग्रामपंचायतींना एमआयडीसीकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र यंदा पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने परिसरातील जलसाठे कोरडे पडले . शिवाय विहिरींनी तळ गाठल्यामुळे परिसरात भिषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जायकवाडी जलाशयातही केवळ 10 टक्यापेक्षा कमी जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. एमआयडीसीने पाणी कपात केल्यामुळे या भागातील ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठ्याचे नियोजन पुरते कोलमडले आहे. आजघडीला जोगेश्वरीत आठवडाभरानंतर पाणी पुरवठा केला जात असल्याने गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागत आहेत. नागरिकांना जार अथवा टॅंकरचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिका-यांकडून टँकरचा प्रस्ताव घेण्यात आला
टॅंकरचा प्रस्ताव पारित –
जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या जोगेश्वरी, कमळापूर, नायगाव-बकवालनगर, रामराई या गावातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गावातील गंभीर बनलेल्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सोमवारी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. या सभेत 5 गावात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी 10 टॅंकर सुरु करण्यात यावे व सीएसआर फंडातून कंपन्यानी पाणी पुरवठा करावा. असा प्रस्ताव सभेत बहुमताने पारित करण्यात आला आहे. या टॅंकरचा प्रस्ताव गंगापूर पंचायत समितीकडे सादर केला जाणार असल्याचे सरपंच योगिता आरगडे, उपसरपंच नजीरखॉ पठाण, ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे यांनी सांगितले. या वेळी माजी सरपंच प्रविण दुबीले, शिवसेनेचे रमेश आरगडे, ग्रामपंचायत सदस्य हिरा सौदागर, मिना पनाड, योगेश दळवी, अनिल वाघ, प्रविण थोरात, प्रभाकर काजळे, गजानन बोंबले, भारती साबळे, संगिता ठोकळ, रुख्मण काजळे, शांताबाई बिलवाल, शिलालाई वाघमारे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *