
वाळूजमहानगर, (ता.4) – जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छतेच्या दिशेने पावले उचलत विविध विकास कामाचे भूमिपूजन नवनिर्वाचित सरपंच योगिता रामेश्वर आरगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रुप ग्रामपंचायत जोगेश्वरी येथील वार्ड क्रमांक दोन आंबेडकर नगर येथील नागरिकांची ड्रेनेज बांधकामासाठी बऱ्याच दिवसाची मागणी होती. दरवर्षी पावसाळ्यात तेथे ड्रेनच नसल्यामुळे पावसाळ्याचे पाणी तसेच घरातले पाणी हे रस्त्यावर, गल्लीत व घरासमोर तुंबायचे ज्यामुळे मच्छर व आरोग्यास धोका निर्माण व्हायचा. स्वच्छतेचे दिशेने ग्रामपंचायत जोगेश्वरीचे नवनिर्वाचित सरपंच योगिता रामेश्वर आरगडे व उपसरपंच नजीरखा फकीरखा पठाण यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर जोगेश्वरी वार्ड क्रमांक दोन येथे भूमिगत गटाराचे तीन कामे हाती घेण्यात आले. तसेच वार्ड क्रमांक एक मध्ये पेविंग ब्लॉक गट्टूचे कामाची भूमिपूजन करण्यात आले. ही कामे ग्रामनिधीतून करण्यात येणार असल्याचे रमेश आरगडे यांनी कळविले. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत जोगेश्वरी चे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
