February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.31) – चवदा वर्षाची अल्पवयीन मुलगी व एकवीस वर्षाचा तरुण या दोघांचा बालविवाह जोगेश्वरी येथे नियोजित करण्यात आला होता. मात्र हा बालविवाह रोखला जाणार. अशी कुणकुण लागल्याने नियोजित स्थळी वधू पोचली नाही. त्यामुळे हा बालविवाह टळला. दरम्यान शासकीय यंत्रणेने नियोजित वधूवरांच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांच्याकडून विवाह न करण्याचे हमीपत्र घेतले.

मुकुंदवाडी परिसरातील प्रियंका 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी व जोगेश्वरी येथील 21 वर्षीय तरुण. या अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह जोगेश्वरी येथे शुक्रवारी (ता.30) रोजी दुपारी आयोजित करण्यात आला होता. या विवाहासाठी त्यांच्या पालकांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र या बालविवाहावर कारवाई होणार असल्याची कुणकुण अल्पवयीन मुलीसह तिच्या नातेवाईकांना लागली. त्यामुळे नियोजित विवाह स्थळी वधू पोचली नाही. दरम्यान या बालविवाहाची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांना मिळताच त्यांनी गंगापूरच्या महिला व बालविकास अधिकारी सुरेखा पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका मिना काळे यांना हा बाल-विवाह रोखण्याचे आदेश दिले. त्यामुळे बालविकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी जोगेश्वरी येथे धाव घेत सरपंच गजाजन बोंबले, उपसरपंच प्रविण दुबिले आदींच्या मदतीने नियोजित विवाहस्थळी भेट दिली. यावेळी बाल संरक्षण कक्ष अधिकारी कल्पना मोहिते, चाईल्ड हेल्पलाईनचे राजेश सरकटे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा लोहकरे, उद्योजक अमोल लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश ठोकळ, किशोर बिलवाल, कृष्णा काजळे, ज्ञानेश्वर निकम, अंगणवाडी कार्यकर्ती मिना गुळे आदींनी पोलिस बंदोबस्तात निखील याच्या घरी गेले. तेथे वर मिळून आला मात्र वधू आलीच नसल्याचे समजले. तसेच विवाहासाठी जमा झालेले नातेवाईक कुटुंबियांची उपस्थिती होती.


समुपदेशन करून घेतले हमीपत्र –
यावेळी बालविवाहासाठी हजर असलेल्या वधु-वराचे नातेवाईक तसेच पालकांचे समुपदेशन करुन बाल विवाह हा कायदेशिर गुन्हा असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे कोवळ्या वयात लग्न झाल्यास मुला-मुलीचा शारिरीक व मानसिक विकास खुंटुन आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे पटवून दिले. शिवाय लग्नाचे वय झाल्यानंतरच मुला-मुलीचा विवाह करण्याचा सल्ला शासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिला. त्यामुळे या अल्पवयीन मुला-मुलीच्या पालकांनी विवाह थांबविण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे लग्नाचे वय झाल्यानंतरच त्यांचे लग्न लावुन असे हमीपत्र वधु-वराच्या पालकांनी दिल्यानंतर हा बाल विवाह टळला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *