
वाळूजमहानगर, (ता.8) – चारित्र्यावर संशय घेण्याचे भूत मनगटावर बसले आणि त्याने तिच्या डोक्यात काहीतरी हत्याराने वार करत खून केला. घाणेगाव येथील संघर्षनगरमध्ये घडलेली ही अत्यंत खळबळ जनक घटना गुरुवारी (ता.8) रोजी सकाळी उघडकीस आली. वाळूज परिसरातील खुनाच्या घटनेत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाळूज परिसरातील संघर्षनगर, घाणेगाव येथील संतोष प्रभाकर जाधव (38) हा वाहन चालक आहे. तो पत्नी लक्ष्मीबाई जाधव (36) सह राहतो. त्यांना 13 वर्षाचा एक मुलगा आहे. सुखाचा संसार सुरू असताना संतोष जाधव यांच्या मानगुटीवर संशयाचे भूत बसले आणि तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. या कारणावरून त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. बुधवारी (ता.7) रोजी याच कारणावरून पती पत्नी यांच्यात रात्री वाद झाला.

वाद वाढल्याने संतोष जाधव याने काहीतरी हत्याराने पत्नीच्या डोक्यात मारले. त्यामुळे जबर मार लागल्याने पत्नीचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता.8) रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित, शेकनाथ आधाने, राहुल निर्वळ, अशोक इंगोले, धनराज राठोड, पोलीस कर्मचारी किशोर घुसले, राजाभाऊ कोल्हे, यशवंत बोबडे, फिरोज तडवी, रोहित चिंधडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आणि आरोपी संतोष जाधव याला ताब्यात घेतले. या घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तपास सुरू आहे –
या घटनेत पती-पत्नीचा वाद होऊन पतीने पत्नीच्या डोक्यात काहीतरी हत्याराने मारून तिचा निर्घृण खून केला. मात्र हे हत्यार नेमके कोणते? याबाबत उलगडा झाला नाही. तसेच मयत महिलेचे कोणत्या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते? याचीही माहिती मिळू शकली नाही. पोलिसांकडून या बाबत एवढेच सांगण्यात आले की, तपास सुरू आहे.
