
वाळुज महानगर, (ता.12)-घर सोडल्यानंतर भरकटलेल्या दोन वृद्ध महिला (अंदाजे वय 78, 80) लिंबेजळगाव येथे भर उन्हात अन्न पाणी विना व्याकुळ झालेल्या होत्या. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत हे तेथून जात असताना त्यांची नजर या दोन वृद्ध महिलांवर गेली. त्यानंतर त्यांनी या महिलांची चौकशी करत त्यांना नाश्ता पाणी देऊन पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यास मदत केली.
दहेगाव (बंगला) येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत हे संभाजीनगर येथे जात असताना त्यांना लिंबेजळगाव येथे राज मोबाईल शाॅपी जवळ दोन वृद्ध महिला आढळल्या. त्या दोघींची विचारपुस केली असता त्या धायमोकलून रडू लागल्या. त्यामुळे गणेश राऊत यांनी त्यांना धीर देत नाष्टा पाणी दिले. त्यांना गाव विचारले असता जालना जिल्हातील सासवाडी गाव सांगितले.
त्यांच्या जवळ कोणतेही ओळखपत्र, आधार कार्ड नव्हते. त्यामुळे दामिनी पथक पोलिस आयुक्तालय संभाजीनगर येथे संपर्क केला असता दामिनी पथकप्रमुख लता जी. जाधव, महीला पोलीस हवालदार अनिता बी खैरे, रुपाली पी.शिंदे यांनी लिंबेजळगाव येथे येवून शहानीशा करून दोन्ही वृद्ध महीला (वय अंदाजे 80, 78) यांना पोलीस व्हॅन मधून वाळूज पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. 
या वेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत, सरपंच समिर सय्यद, उमेश चिडे, कैलाश भवर, आकाश तारक यांची उपस्थिती होती. पोलिसांनी जालना कंट्रोल रूमला संपर्क केला असून ते गावाची खात्री करून दोन्ही वृद्ध महिलांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात येणार आहे.
