March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.17) – घराजवळ आला, फोन करून बोलावून घेतले आणि पिस्तूल काढून डोक्यात गोळी घातली. ही गोळी डोक्याच्या आरपार गेल्याने 35 वर्षीय उद्योजक जमिनीवर कोसळून जागीच ठार झाला. एखाद्या चित्रपटाला साजेशी ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीत रविवारी (ता.17) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिल्लेगाव तालुका गंगापूर येथील सचिन साहेबराव नरोडे (35) हे वाळुज औद्योगिक वसाहतीत लघु उद्योजक आहेत. त्यांचा वडगाव को गट नंबर मध्ये शेगडी तयार करण्याचा लघुउद्योग आहे.

नरोडे हे साजापूरच्या बालाजीनगरात आई शोभाबाई, वडील साहेबराव व मुलगी स्वारांजली (11) यांच्यासोबत राहत. रविवारी (ता.17) रात्री 8 वाजेच्या सुमारास सचिन नरोडे यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करुन घराबाहेर बोलावले.

घराजवळ जलवाहिनीचे काम चालू असून शेजारीच मोकळी जागा आहे. तेथे नरवडे गेल्यानंतर अज्ञात आरोपीने गावठी पिस्तूल मधून नरोडे यांच्या डोक्यात गोळी मारली. नरोडेखाली कोसळताच अज्ञात मारेकरी फरार झाला.

गोळीबार झाल्यानंतर मोठा आवाज झाल्याने काही नागरिक घराबाहेर आले असता त्यांना सचिन नरोडे हे रक्ताच्या थारोळ्यात लथपथ अवस्थेत पडलेले दिसले. मोठा रक्तस्त्राव होऊन सचिन नरोडे घटनास्थळीच गतप्राण झाले. ही घटना घडली त्यावेळी तेथे लाईट गेलेली असल्याने सर्वत्र अंधार होता.

घटनास्थळी पोलिसांची धाव
उद्योजकाचा खून झाल्याची माहिती मिळताच
वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, संदीप शिंदे, पोलीस अंमलदार योगेश शेळके व पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकाकडून घटनेची माहिती जाणुन घेतली.

दरम्यान पोलीस उपायुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस उपायुक्त महेंद्र देशमुख यांनीही भेट देऊन तपास कामी सुचना केल्या. यावेळी श्वान पथक तसेच बॉम्ब शोधक पथक, ठसे तज्ञ यांनीही घटनास्थळी धाव घेत माघ काढण्याचा प्रयत्न केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *