February 5, 2026

वाळुजमहानगर (ता.2) – गाईंची अवैध कत्तल करून गोवंशाचे मांस वाहतुकीसाठी चक्क इनोव्हा कार वापरली, मात्र गोरक्षक व पोलिसांनी ही कार छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचण्यापूर्वीच वाळूज पोलिसांनी अडवली. आणि चालकासह दोन आरोपींना बेड्या घालून 800 किलो गोमांस, एक इनोव्हा कार, दोन संशयास्पद नंबर प्लेट असा जवळ जवळ साडेसात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी 2 डिसेंबर रोजी सकाळी वाळुज येथे करण्यात आली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, इनोव्हा व स्विफ्ट कारमधून वाळुजमार्गे गोमांसाची वाहतूक होणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून मिळाल्याने वाळूज पोलिसांनी टोल नाक्यावर नाकाबंदी केली. नाकाबंदी सुरू असताना मिळालेल्या माहितीतील एक ग्रे रंगाची टोयोटा इनोव्हा (एम एच 14, सी एस -1516) ही कार सुसाट वेगात आली.

बॅरिकेट्स तोडून पळून जाण्याचा प्रयत्न –
अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी ही इनोव्हा कार वाळूजजवळील टोल नाक्यावर येताच नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी कारच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र तरीही चालकाने कार वेगाने पुढे नेऊन पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून पळ काढला.

वाहन आडवे लावून रोखली कार –
टोल नाक्यावर पोलिसांचे बॅरिकेट तोडून फरार झालेली कार वाळूज मार्गे जात असल्याची माहिती मिळताच रस्त्यावर वाहन आडवे लावून पाठलाग करत इनोव्हा कार वाळुज पोलीस ठाण्यासमोर रोखवली.

संतप्त जमावाने केली तोडफोड –
या कारची तपासणी केली असता मागील सीट व डिकीत मोठ्या प्रमाणात मांस भरलेले आढळले. दरम्यान घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने रोष व्यक्त करत इनोव्हाची तोडफोड केली. पोलिसांनी कार चालक हुसेन इब्राहिम तांबोळी (वय 45) व जिकरान अस्लम शेख दोन्ही रा. ममदापुर, ता. राहाता, जि. अहमदनगर यांना ताब्यात घेतले.

ममदापूर येथून संभाजीनगरात विक्री –
पुढील चौकशीत दोघांनीही हे मांस ममदापूर येथील नाजिम कुरेशी याचे असल्याचे सांगितले. नाजिम कुरेशीने ममदापुर येथे गाई कापून त्याचे मांस इनोव्हा कारमध्ये भरून छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीसाठी पाठविले असल्याचे त्यांनी कबूल केले. तसेच पकडलेल्या कारची तपासणी केली असता आत मध्ये (एम एच 04, डी जे -8129) या नंबरच्या दोन वेगळ्या नंबर प्लेट सुद्धा सापडल्या.
साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त –
मांस वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून पोलिसांनी 2 लाख 40 हजार रुपये किमतीचे अंदाजे 800 किलो गो मांस, 5 लाख रुपये किमतीची एक टोयोटा इनोव्हा कार व बनावट नंबर प्लेट असा 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.


तिघांविरुद्ध गुन्हा –
या प्रकरणात आरोपी हुसेन तांबोळी, जिकरान शेख आणि मालक नाजिम कुरेशी यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 325 तसेच महाराष्ट्र प्राणी संवर्धन अधिनियम कलम 5, 5 (क), 9 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

   यांनी केली कारवाई –
ही कारवाई वाळुज पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लक्कस, कारभारी रावते, सचिन त्रिभुवन, जगताप, पो.अं. कांबळे व विकास जाधव आदींनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *