वाळूज महानगर, (ता.10) – भात शिजवत असताना गॅस गळती होऊन संपूर्ण घरासह संसारोपयोगी साहित्य व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाले. दरम्यान आग विझवण्याच्या प्रयत्नात पंधरा वर्षीय मुलाला या आगीची झळ लागली. ही घटना वाळूज येथील म्हसोबानगरात मंगळवारी (ता.9) रोजी दुपारी घडली.
विठ्ठलसिंग नरसिंग चव्हाण, वय 60, हे म्होसोबानगर, नायगाव गरवारे गेटच्या समोर वाळुज, ता. गंगापुर येथे कुटुंबासह राहतात मंगळवारी (ता.9) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विठ्ठलसिंग चव्हाण यांच्या पत्नीने भात शिजवण्यास ठेवला. दरम्यान गॅस गळती होऊन सिलेंडरने पेट घेतला. आणि घराला आग लागली. ही आग विझवण्याचा प्रयत्न करीत असताना विठ्ठलसिंग चव्हाण यांचा नातु रणविर चव्हाण (वय 15 वर्ष) याला आगीची झळ लागून त्याच्या खांद्याला व हाताला इजा झाली. आग जास्तच वाढत असल्याने आग्नीशमक दलाला पाचारण करण्यात आल्याने त्यांनी आग विझवली.
या आगीत संपुर्ण पत्र्याचे घर, घरातील टिव्ही, फ्रीज व संसार उपयोगी साहित्य, व गाडीचे कागदपत्रे, आधार कार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, कपडे, भांडे तसेच घरगुती वापरायाच्या वस्तु पुर्णपणे जळून खाक झाल्या. या आगीची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
