
वाळुजमहानगर – वाळूज येथील गुड इयर कंपनी कामगारांचा वेतन वाढीचा 10 वा करार कंपनी व्यवस्थापन अधिकारी व सिटू सलग्न, मुंबई श्रमिक संघ कामगार संघटनेचे मुंबई श्रमिक संघाचे पदाधिकारी यांच्यात 29 नोव्हेंबर रोजी यशस्वी होऊन कामगारांना तब्बल 25 हजार 400 रुपये भरघोस पगारवाढ करण्यात आली.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील टायरचे उत्पादन घेणाऱ्या गडईयर टायर्स या कंपनीत 663 कायमस्वरूपी कामगार आहे. मागील करा संपुष्टात आल्याने नव्या करारासाठी गेल्या अनेक महिन्यापासून बोलणी सुरू होती. अखेर हा करार कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनेच्या समन्वयाने यशस्वीरित्या झाला. या करारप्रसंगी कंपनी व्यवस्थापनाचे प्लाँट हेड जेफ्री व्हाईटली, एचआर हेडचे सुभाष झा, एच आर व्यवस्थापक प्रदिप आग्रवाल, प्रोडक्शन हेड राजू गायकवाड, क्वालिटी हेड प्रकाश कोणाकाला, इंजिनिअरिंग हेड सुधाकर मुदगूल, फायनान्स हेड अंजन सतपती यांच्यासह कामगार संघटनेचे अध्यक्ष काँम्रेड डॉ विवेक माँटेरो, जनरल सेक्रेटरी काँम्रेड हेमकांत सामंत, उपाध्यक्ष सईद अहमद, सचिव राजेंद्र देवकर व कामगार बांधवांची उपस्थिती होती.
नव्या कामगार वाढीच्या करारानुसार कामगारांना आता सीटीसीनुसार 1 लाख 30 हजार रुपये असा भरघोस पगार मिळणार असल्याची माहिती कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दोन डिसेंबर रोजी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. पहिल्या टप्प्यात 18 महिन्यासाठी 18 हजार रुपये व दुसरा टप्पा 12 महिन्यासाठी 7 हजार 400 रूपये असा 25 हजार 400 रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे पुर्वीच्या 88 हजार 500 रुपयावरुन आता सीटीसीनुसार 1 लाख 30 हजार रुपये वेतन प्रत्येक महिन्याला मिळणार आहे.
तसेच नवीन कामगारांना महागाई भत्ता प्रत्येक पाँईटला 1 पैशाची वाढ, फेस्टिवल 25 वरुन 30 हजार, 25 वर्षे सर्व्हिसनंतर 20 वरुन 25 हजार, कामगार अपत्य शिक्षण, लग्नासाठी बीनव्याज 1 लाख 75 हजार अडवान्स, ग्रुप मेडिकल पाँलीसी 2027 पर्यंत लागू करणे, निव्रूत्त कामगारांना कायदेशीर बाबी व्यतिरिक्त 1 लाख 25 हजार रुपये मदत, गंभीर आजारासाठी 2 लाख व 90 ऐवजी 100 दिवसांचा अर्धा पगार, मयत कामगाराच्या वारसाला सर्व कामगाराचा एक दिवसाच्या पगारातील जमा रकमेच्या 1 लाख 75 पट कंपनी देणार. ही रक्कम सरासरी 35 लाखापर्यंत असणार आहे. नवीन कंपनी भरतीवेळी नातेवाईकांना प्राधान्य देणे, पगारवाढ करार, निवृत्त कामगारांना हजेरी नुसार थकबाकी देणे आदी मागण्या या पगारवाढ करारपत्रात नमूद करण्यात आल्याचे यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला गुडईयर टायर युनिट अध्यक्ष काँ अर्जुन पिटेकर, जनरल सेक्रेटरी राजेंद्र देवकर, उपाध्यक्ष काँ शंकर पाटील, उपाध्यक्ष काँ काशिनाथ साळुंखे, जाँईंट सेक्रेटरी काँ राजू शिंदे, खजिनदार काँ दिगंबर गायके, सदस्य शिरिष कामजळकर, विठ्ठल कोळेकर, लक्ष्मण लांडेपाटील आदींची उपस्थिती होती.
