वाळूज महानगर ता.5 – दोन जिवंत काडतुस व एक गावठी कट्टा असा 46 हजार रुपये किमतीचा ऐवज विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला वाळुज एमआयडीसी पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सिडको वाळूज परिसरात करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शेख सलीम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास वैष्णव, पोलीस हवालदार बाबासाहेब काकडे, नितीन इनामे आदी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हदीत अवैध धंदे चालकाचा तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेत असतांना विलास वैष्णव यांना माहिती मिळाली की, सिडको वाळूज महानगर पाण्याच्या टाकीच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात एक इसम त्याच्या कमरेला कट्टा (बंदुक) लावून कोणाला तरी विक्री करण्याच्या ईराद्याने बसला आहे. या माहितीवरुन पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे त्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता.5) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास छापा मारला असता तेथे आरोपी सय्यद सैफ सय्यद असद उर्फ (दादा) वय 29 वर्ष, हा रिक्षाचालक रा. कटकटगेट नेहरूनगर डिकाशन हॉटेलजवळ गल्ली नं.2, छत्रपती संभाजीनगर विनापरवाना, बेकायदेशिररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात व कब्ज्यात 46 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंडसह बाळगतांना मिळून आला.
याप्रकरणी पोलीस हवालदार बाबसाहेब काकडे यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचे शस्त्रबंदीचे आदेश न पाळता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त नितीन बागटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.