
वाळुज महानगर, (ता.25) – नऊ महिन्याची गरोदर असलेल्या रांजणगाव (शेणपुंजी) येथील 29 वर्षीय महिलेला उपचारार्थ दाखल केले असता तिचा प्रसूतीपूर्वीच बाळासह संशयास्पद मृत्यू झाला. ही अत्यंत खळबळजनक घटना मंगळवारी (ता. 22) रोजी रात्री 8:18 ते 11:55 वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुजा सचिन सुर्यवंशी (वय 29) रा. दाभड ता. आर्धापुर जि. नांदेड (ह.मु. सद्गुरुनगर, राजणगांव (शे.पु.) ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर) ही नऊ महिन्याची गरोदर होती. तीला सद्गुरुनगर राजणगांव (शे.पु.) येथील राहते घरी अचानक चक्कर व झटके येवुन रक्तदाब वाढून बाळंतपणाचा भास होऊ लागला. त्यामुळे तीला सुभाष सूर्यवंशी, सचिन सुर्यवंशी यांनी मंगळवारी (ता. 22) रोजी रात्री 8:18 वाजेच्या सुमारास उपचारार्थ प्रथम बजाजनगर येथील ममता हॉस्पिटल या खाजगी दवाखान्यात व नंतर घाटी दवाखाना अपघात विभागात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी पुजा हिस तपासून रात्री 11:55 वाजता मयत घोषित केले.

याप्रकरणी बेगमपुरा घाटी मेडिकल चौकीचे पोलीस हवालदार ए. आर. खिल्लारी यांनी दिलेल्या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गिरी करीत आहे. या संशयास्पद मृत्यूच्या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
