वाळूजमहानगर, ता.2 – गंगापूर खुलताबाद मतदारसंघात विकासाचा मोठा अनुशेष तयार झाला आहे. या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यावर माझा भर असून यासाठी मतदारांनी साथ द्यावी. असे आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी केले.
गंगापूर विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी आज गंगापूर तालुक्यातील रामराई, राजुरा, शिरोडी, मलकापूर, डोमेगाव, पिंपळवाडी, पखोरा, नवाबपूरवाडी, सिध्दपूर आदी गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, गंगापूर खुलताबाद मतदारसंघात लक्ष घातल्यानंतर तातडीने जे प्रश्न शासन दरबारी सोडवता येतील असे प्रश्न मी सातत्याने विधिमंडळात व शासनस्तरावर पाठपुरावा करून सोडून घेतले. अनेक गावात-वाडी वस्तीवर जाण्यास रस्ते नव्हते, त्याठिकाणी सिमेंट रस्ते केले. मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर करून आणला आणि त्यामाध्यमातून अनेक कामे मार्गी लावली. मतदारसंघाचे गत पंधरा वर्षात प्रश्न सुटले नाहीत उलट वाढलेत. गंगापूर, खुलताबाद तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय असून शेतकरी, कष्टकरी सामान्य माणसांचे प्रश्न जैसे थे आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण मला नेतृत्व करण्याची संधी दिली तर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यावर माझा भर राहील असे आमदार सतीश चव्हाण म्हणाले.
याप्रसंगी अंकुश काळवणे, लक्ष्मण पाठे, योगेश आरगडे, ह.भ.प.नंदु महाराज फांदाडे, किशोर बिलवाल, संजय काजळे, मोईज शेख, नंदु सोनवणे, माणिक राऊत, तुषार कुंजर, कृष्णा पाटेकर, बाळू गोरे, कृष्णा बोबडे, सुरेश वाघमारे, सुरेश वाघचौरे, मनोज शेवाळे, अप्पासाहेब वाघमारे, साईनाथ वाघचौरे, मदन वाघमारे, महेश शेवाळे, रामचंद्र शेवाळे, नानासाहेब शेवाळे, नानासाहेब भुंजग आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.