वाळूजमहानगर, ता.31 – खोटे लग्न करून देऊन रोख 3 लाख रुपये व अंगावरील सोन्या चांदीच्या दागिन्यास फरार झालेल्या चौघांपैकी तीन जणांना वाळुज एमआयडीसी पोलिसांनी पकडून गुरुवारी (ता.31) रोजी जेरबंद केले. 26 मार्च 2024 रोजी ते 3 एप्रिल 2024 रोजी दरम्यान जोगेश्वरी व गेवराई येथे घडलेल्या या प्रकरणातील नवरी मुलगी अद्यापही फरार आहे. विशेष म्हणजे या आरोपीतांनी अनेकांना फसवल्याचेही तपासात उघडकीस आले.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, कुबेर गेवराई ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथील हरिश्चंद्र अशोक कुबेर (वय 33) याचे लग्न होत नसल्याने त्यांनी कुंडलिक शाहू चव्हाण रा.हरिसिध्दी लॉन्सजवळ कमळापुर ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर याच्याशी संपर्क केला असता त्याने व त्याचे साथीदार कल्पना प्रकाश मुराळकर, मनीषा कुंडलिक चव्हाण रा. लक्ष्मी कॉलनी, संभाजीनगर यांनी कुबेर याला वाळूज परिसरातील जोगेश्वरी ता. गंगापूर जि. संभाजीनगर येथे लग्नाकरीता मुलगी दाखवून लग्न लावून देण्याच्या मोबदल्यात कुबेर याच्या कडून 3 लाख रुपये देण्याची बोलणी करून मुलगी कुसुम अजय चव्हाण हिचे सोबत कुबेर गेवराई येथे लग्न लावून दिले. व कुबेर याच्याकडून 27 मार्च 2024 रोजी 3 लाख रुपये घेतले. लग्नानंतर 3 एप्रिल 2024 रोजी मुलगी कुसुम अजय चव्हाण हिने चुलत भाऊ मरण पावला असे कारण सांगुन मामा सोबत निघुन गेली. त्यानंतर कुबेर याने लग्न जुळवून देणाऱ्यांना मुलीबाबत वारंवार संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवुन नांदण्यास येण्यासाठी नकार दिला. त्यामुळे कुबेर यांना संशय आल्याने त्याने जोगेश्वरी येथे येवून चौकशी केली असता त्यास समजले की, यातील आरोपीतांनी संगनमत करुन पैसे घेवुन अनेकांची खोटे लग्न लावुन दिल्याचे समजले. त्यावरुन कुबेर यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन कलम 420, 467, 417, 34 भादवि. गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्हा तपास करताना तपास अधिकारी सपोनि. मनोज शिंदे यांनी आरोपी कुंडलिक शाहू चव्हाण वय 54) रा.हरिसिध्दी लॉन्सजवळ कमळापुर ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर, कल्पना प्रकाश मुराळकर (वय 47), संगिता कुंडलिक चव्हाण (वय 42 वर्ष) रा. लक्ष्मी कॉलनी, छावणी ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांना अटक करुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणातील नवरी मुलगी कुसुम अजय चव्हाण ही मात्र फरार आहे.
या गावात केली फसवणूक –
कुबेर याला फसविल्याप्रमाणेच आरोपींनी
नानासाहेब शंकर बांदल रा. मोहोळकरवाडी ता. वाई जि.सातारा, विनोद हनुमंत वाघ रा. कळंबे ता. वाई जि. सातारा (3) युवराज अशोक बांदल रा. मोहोळकरवाडी ता. वाई जि. सातारा, विपुल दिपक पाटील रा. प्रियंका टाउन दिडोली ता. जि. सुरत (राज्य गुजरात) तसेच बोरगाव ता. सिल्लोड, भटाना ता. वैजापुर, घोसा ता. नेवासा जि.अहमदनगर, मालेगाव जि. नाशिक, कापडणे ता. जि. धुळे, भडगाव ता.पाचोरा जि.जळगाव, पाथर्डी जि.अहमदनगर अशा विविध गावातील तरुणांचे पैसे घेवून खोटे लग्न लावुन देवून फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांचे आवाहन –
हा गुन्हा उघडकीस येतात वाळुज एमआयडीसी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, उघडकीस आलेल्या या गुन्ह्याप्रमाणे ज्या लोकांचे खोटे लग्न लावुन फसवणुक झालेली आहे. अशा लोकांनी पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज येथे संपर्क साधावा.
यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस आयुक्त, प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, सहा. पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी वाळूज ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सपोनि. मनोज शिंदे, पोउपनि. दिनेश वन, पोह विनोद नितनवरे, महिला पोलीस हवालदार जयश्री म्हस्के, जयश्री फुके, पोह. जालीधर रंधे, मनमोहनमुरली कोलीमी, यशवंत गोबाडे, विशाल पाटील, मनोज बनसोडे, नितीन इनामे, गणेश सागरे, समाधान पाटील, सीमा मुळे यांनी केली.