वाळूजमहानगर, (ता.30) – कुर्हाडीने सपासप वार करून मेहुण्याला लाकडासारखे तोडणाऱ्या आंतरजातीय साल्याला वाळुज पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील भोकर जवळ अटक करून शुक्रवारी (ता.30) रोजी गंगापूर न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

याप्रकरणी वाळूज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भोकर येथील बाबासाहेब उर्फ बापु छबु खिल्लारे (वय 30) याचा गावातीलच सचिन शामराव नाटकर (वय 25) या तरुणाने कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी (ता.29) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली होती. वाळूज परिसरातील इसारवाडी फाट्यावर भर रस्त्यात झालेल्या या खळबळ जनक हत्येची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत तपास कामी सूचना केल्या. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी तात्काळ आरोपी नाटकर याचा शोध घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील भोकर जवळ त्याला दुचाकीवर जाताना झडप घालून जेरबंद केले. शुक्रवारी (ता.30) रोजी वाळूज पोलिसांनी आरोपी सचिन शामराव नाटकर याला गंगापूर न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी ढोले करीत आहे.
