
वाळुज महानगर, (ता.16) – धारदार चाकूने पोटावर हल्ला करून एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बजाजनगर येथे 16 सप्टेंबर रोजी घडली. या धक्कादायक घटनेमुळे वाळुज परिसरासह छत्रपती संभाजीनगरात मोठी खळबळ उडाली आहे.
वाळूज औद्योगिकनगरीतील बजाजनगरच्या कोलगेट चौकात किरकोळ वादातून चाकू हल्ला करण्यात आला. 16 सप्टेंबर रोजी दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, कोलगेट चौक हे मोठ्या वर्दळीचे ठिकाण आहे. अशातच दिवसाढवळ्या अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस प्रशासन गुन्हेगारावर अंकुश ठेवण्यासाठी वज्रमुठ आवळली असतानाच गुन्हेगार दहशत पसरविण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी कृत्य करत आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून परिसर दहशतीखाली आहे.
