
वाळूजमहानगर, ता.1)- हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेल्या कासोडा येथील सय्यद जलालुद्दीन (रह.) उर्फ सय्यद बाबा यांच्या उरुसाची उत्साहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. तीन दिवस दिवसीय या उरुसात दरम्यान संदल मिरवणूक, चादर चढवणे व कुस्त्याच्या दंगल आदी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील सर्वधर्मीय भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

वाळूज परिसरातील कासोडा येथे सुमारे चारशे वर्षाची परंपरा असलेल्या सुफी संत सय्यद जलालुद्दीन (रह.) उर्फ सय्यद बाबा यांचा दरवर्षी गुढी पाडव्याच्या 9 दिवसानंतर भव्य उरुस भरतो. या उरुसनिमित्त दर्गा कमिटीच्यावतीने सय्यद बाबा यांच्या दर्गाची रंगरंगोटी करुन आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. उरुसाच्या आदल्या दिवशी सजविलेल्या घोड्यावर व ढोल-ताशाच्या गजरात गावातून भव्य संदलची मिरवणुक काढण्यात आली. या संदल मिरवणुकीत गावातील सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला. रविवारी उरुसाच्या दिवशी दर्गामध्ये फजरच्या नमाजनंतर फातेहा पठण करुन उरुसाला सुरुवात करण्यात आली. सय्यद जलालुद्दीन बाबा यांच्या मजारवर चादर चढवण्यात आली. यावेळी कासोडा, पंढरपूर, घाणेगाव, साजापूर, आंबेलोहळ, गाजगाव, विटावा आदी भागातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सय्यद बाबा यांच्या मजारवर चादर अर्पण केल्यानंतर भाविकांनी चिमुकल्यासह उरुसमध्ये खरेदीचा आनंद लुटला. उरुसाच्या तिस-या दिवशी सोमवारी कुस्त्यांची दंगल झाली. यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत जिल्हाभरातुन कुस्तीगिरांनी सहभाग घेतला. विजेत्यास रोख स्वरुपाची पारितोषीके देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उर्स कमिटीचे मिर्झा भिक्कन बेग, मिर्झा शब्बीर बेग, शेख चॉद शेखलाल, मिर्झा बशीर बेग, वजीर बेग यांच्यासह कासोडा येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
