वाळूज महानगर (ता.19) :- अमरावतीकडून देवगडकडे दर्शनासाठी जाणारी वँगन आर कार व नगरकडून वाळुजकडे येणारी मारुती सुझुकी स्विफ्ट कार यांच्यामध्ये भीषण अपघात होऊन वाळूज परिसरातील चार जण जागीच ठार झाले तर अमरावती येथील पाच जण जखमी झाले. हा भीषण अपघात औरंगाबाद पुणे राष्ट्रीय महामार्गावर कायगाव जवळ शुक्रवारी (ता.18) रोजी रात्री 9.30 ते 10 वाजेच्या सुमारास झाला.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की,
वाळूज परिसरातील बकवालनगर, वाळूज येथील रतन शांतीलाल बेडवाल (38), व सिडको वाळूज महानगर येथील सुधीर पाटील (50), रावसाहेब मोटे (50) व भाऊसिग गिरासे (45) असे चार जण मारुती सुझुकी स्विफ्ट कार (एम एच 20, सीएस – 5982) नगरकडून औरंगाबाद कडे येत होते. तर वॅगन आर (एम एच 27, बीझेड – 3889) या कारमधील जखमी प्रवासी अमरावतीहून देवगड जि.अहमनगर येथे देव दर्शनासाठी मुक्कामी जात होते. ही दोन्ही वाहने औरंगाबाद पुणे महामार्ग वरील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायगाव जवळ येतात त्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सिडको वाळूज महानगर व बकवालनगर येथील चार जण जागीच ठार झाले. तर अमरावती येथील वॅगन आर कार (एम एच 27, बी झेड -3889) मधील शशीकला भाऊराव कोराट (70) सिद्धार्थ जंगले (14), हेमंत जंगले (55) छाया हेमंत जंगले (35) कुंतला दिगंबरराव जंगले (70) असे पाच जण जखमी झाले. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून हा भिषण अपघात झाला. या अपघातात फार झालेले चौघेही व्यावसायिक होते. अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पोनि अशोक चौरे, उपनिरीक्षक विलास, घुसींगे, डॉ.प्रशांत पंडूरे, रुग्णवाहिका चालल सागर शेजवळ, सचिन सुराशे, अनंता कुमावत आदींनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
अपघातानंतर नंतर वाहतुकीची कोंडी –
अपघातानंतर नगर औरंगाबाद महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून अपघातस्थळी नेण्यात आल्या.