March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – करोडी येथे होत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह बालकल्याण समिती व दामिनी पथकाने गुरुवारी (ता.2) रोजी दुपारी उधळून लावत नववधूसह तिच्या आई-वडिलांचे समुपदेशन केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील करोडी येथील टोलनाक्याच्या बाजूला राजस्थानी हॉटेलच्या मागे बालविवाहाचे आयोजन करण्यात आले होते. ही माहिती मिळताच बालकल्याण समिती व दामिनी पथकाने तेथे धाव घेतली. यावेळी तेथे मंडप टाकलेला दिसला. मंडपात काही वराडी बसलेले होते. तसेच लग्नामध्ये नवरीला देतात ते कन्यादानाचे साहित्यही लावलेले होते. विचारपूस केली असता मंडपाच्या मागे नवरीच्या वेशभूषेत एक मुलगी दिसली. तिला तिचे नाव, गाव व व वय विचारले असता सतरा वर्षे असे सांगितले. मुलीचे आधार कार्ड व टीसीवरून मुलीचे वय हे सतरा वर्ष एक महिना दिसून आले. मात्र नवरदेव हा मंडपात दिसून आला नाही. तो पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला. जिल्हा महिला बाल कल्याण समितीचे सचिन गोड, तसेच दामिनी पथक प्रमुख कांचन मिरधे यांनी मुलीच्या आई-वडिलांना बालविवाह कायदा बाबत सविस्तर माहिती सांगत मुलीचा विवाह अठरा वर्षाची होईपर्यंत करू शकत नाही. याबाबतीत समुपदेशन करून बालविवाह थांबविण्यात आला. हा बालविवाह थांबवण्यासाठी महिला पोलीस हवालदार कल्पना खरात, महिला पोलीस हवालदार सुजाता खरात, महिला पोलीस अंमलदार अनिता खैरे, सिंधू वाडेकर, सोनाली निकम, कविता धनेधर, मनीषा तायडे यांचा सहभाग होता. या बालविवाहबाबत दौलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *