February 5, 2026

कणकोरीच्या शाळेची दुरावस्था, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात वाळूज महानगर (ता.4) – कणकोरी तालुका गंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी येथील मोडक्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अनेक अडचणी येत असून त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे या शाळेची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी होत आहे.

कणकोरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या सहा वर्ग खोल्या असून एक खोली कार्यालयासाठी वापरली जाते. तर एक खोली मोडकळीस आली आहे. उर्वरित चार खोल्यांची ही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कणकोरी येथे जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यात यावी. तसेच सध्या असलेल्या शाळेची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी भाजपा तालुका सरचिटणीस अर्जुन पवार व उषा पवार यांनी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर गंगापूर गटशिक्षण आधिकारी अरविंद कापसे यांच्याकडे सुद्धा हीच मागणी केली होती. त्यानंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी कणकोरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्युनिअर इंजिनिअर संजय वानखेडे यांना पाहणी करण्यासाठी पाठवले होते. त्यांनी शाळेची पाहणी करून पत्रही दिले. त्यानंतर शालेय कमिटीचे अध्यक्ष मनोज पवार व मुख्याध्यापक कडूबाळ निकम यांचे पत्र व सर्व कागदपत्राची पूर्ण फाईल शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे कणकोरी येथील जिल्हा परिषद शाळेला लवकरच निधी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *