वाळूजमहानगर, (ता.20)- कार समोर दुचाकी आडवी लावून चाकुचा धाक दाखवून उद्योजकाला लुटणाऱ्या चौघांपैकी दोघांना जेरबंद करुन आरोपींच्या ताब्यातून रोख रकमेसह चाकू आणि सुरा जप्त करण्यात आला. ही कारवाई वाळूज एमआयडीसी पोलीसांनी चार तासाच्या आत केली. यातील एक जण विधीसंघर्ष बालक असून दुसरा अद्यापही फरार आहे़.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजक मकरंद देशमुख हे रविवारी (ता.19) रोजी दुपारी 1 वाजता कार (एम एच 20, डी व्ही -0571) मधून घराकडे जात होते. वाळूज औद्योगिक वसाहतीतील व्हेरॉक कंपनीजवळ येताच एका विना क्रमाकाच्या दुचाकीवर आलेल्या चौघांनी देशमुख यांची कार अडवली. यातील दोघांनी त्यांच्या गळ्याला चाकू लावत जीवे मारण्याची धमकी देत 5 हजार रुपयाची मागणी केली. त्यामुळे घाबरलेल्या देशमुख यांनी पैसे देण्यासाठी पॉकेट काढले असता ते हिसकावून घेत पळ काढला. यात रोख 15 हजार रुपये रकमेसह आधारकार्ड, डेबिट कार्ड यासह इतर कागदपत्रे होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच वाळुज एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहिती काढुन आरापी संतोष अण्णा धांडे (वय 28), आकाश राजू गायकवाड (वय 21) व एक विधी संघर्ष बालक यांचा रांजणागाव येथे शोध घेत ताब्यात घेतले. त्यांची अधिकची चौकशी केली असता आरोगुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून लुटमारीतील 4 हजार रुपये रोख, एक चाकु व सुरा जप्त करण्यात आला. या प्रकरणातील एक आरोपी मात्र अद्यापही फरार आहे.
यांनी केली कामगिरी –
ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक कृष्णा शिंदे, दुय्यम निरिक्षक जयंत राजुकर, सपोनि मनोज शिंदे, पोउपनि. चंद्रकांत कामठे, सुरेश भिसे, नितिन इनामे, हनुमान ठोके, यशवंत गोबाडे, गणेश सागरे, समाधन पाटील, विठ्ठल शिगाडे, जालिधंर रंधे आदीनी केली.
आरोपी कुख्यात गुन्हेगार –
दरम्यान दोन्हीही आरोपी कुख्यात गुन्हेगार असून दोघांनाही तडीपार करण्यात आले होते. त्यातील संतोष धांडे याच्या विरूध्द 5 तर आरोपी राजु गायकवाड यांच्या विरूध्द 3 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.