March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.15) – काही एक कारण नसताना वारंवार कंपनीत येऊन उद्योजकाला व त्याच्या भागीदाराला प्रत्यक्ष भेटून व फोनवर वारंवार दोन लाख रुपयांची मागणी करत तसेच पैसे न दिल्यास इतर सरकारी कार्यालयात तक्रार देऊन त्रास देण्याची तसेच पोलिसात गेल्यास ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन लाखाची खंडणी मागणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंच चा अध्यक्ष तथा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याविरुध्द बुधवारी (ता.15) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
दिगंबरराव विनायकराव नाईक (64), रा. सातारा परिसर यांची वाळूज वसाहतीत आर.डी. इंजिनिअर्स या नावाची कंपनी आहे. या कंपनीत उद्योजक राजेंद्र शिंगाडे हे भागीदार असून या कंपनीत विविध प्रकारच्या मशीनचे पार्ट तयार करण्यात येतात. गेल्या अनेक महिन्यापासून उद्योजक नाईक यांच्या कंपनीत येऊन आरोपी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चा संस्थापक अध्यक्ष तथा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता अशोक वाहुळ हा पैशाची मागणी करुन त्रास देत आहे. मात्र उद्योजक नाईक यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने अशोक वाहुळे याने त्यांच्या विरोधात एमआयडीसी कार्यालयाकडे तक्रार देण्याच्या धमक्याही दिल्या. तक्रार न देण्यासाठी अशोक वाहुळ याने 2 लाख रुपयाची खंडणीची मागणीही अनेकदा करुन उद्योजक नाईक व त्यांचे भागीदार राजेंद्र शिंगाडे यांना सतत त्रास देण्यास सुरुवात केली होती. पैसे मिळत नसल्याचे लक्षात येताच अशोक वाहुळ याने उद्योजक नाईक यांनी कंपनीत अनधिकृत बांधकाम करुन अतिक्रमण केल्याची तक्रार एमआयडीसीकडे केलेली आहे. या तक्रारीनंतर एमआयडीसी प्रशासनाकडून उद्योजक नाईक यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

   दोन लाख रुपये द्या तक्रार मागे घेतो –
अतिक्रमणाबाबतची तक्रार केल्यानंतर अशोक वाहुळ याने मंगळवारी (ता.14) रोजी उद्योजक नाईक यांच्या शेजारील किशोर खांडरे यांच्या मोबाईलवर संपर्क करून दिंगबर नाईक व त्यांचे भागीदार राजेंद्र शिंगाडे यांना समजावून सांगा व तक्रार मागे घेण्यासाठी 2 लाख देण्यास सांगा. यावेळी खांडरे यांनी भागीदार शिंगाडे यांच्याकडे फोन दिला असता वाहुळ याने त्यांनाही धमकी देत तक्रार परत घेण्यासाठी 2 लाख रुपयाची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास तुमच्या विरोधात इतर शासकीय कार्यालयात तक्रारी करण्याची व पोलिस ठाण्यात गेल्यास मी व माझे कार्यकर्ते तुमच्या विरोधात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करु अशा धमक्या दिली.
 त्रस्त उद्याजकाची पोलिसात धाव-
आरोपी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चा संस्थापक अध्यक्ष तथा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता अशोक वाहुळ हा सतत कंपनीत येऊन तसेच प्रत्यक्ष भेटुन व फोनवर संपर्क करुन खंडणीची मागणी करीत असल्याने त्रस्त झालेल्या उद्योजक नाईक व त्यांचे भागीदार शिंगाडे यांनी पोलिसात धाव घेत घेतली. या प्रकरणी उद्योजक दिंगबर नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात खंडणी व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वाती उचित या करीत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *