वाळूज महानगर, (ता.24)- आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागतोय, माझ्या मराठा समाजाच्या आरक्षणाला जो विरोध करील त्याचा फैसला विधानसभेत होईल. त्यामुळे सावध पवित्रा घ्या. नसता दशा वाईट होईल, कांदे विकत बसावे लागेल असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सिडको वाळूज महानगर येथील विराट जाहीर सभेत गुरुवारी (ता.23) रोजी दिला.
सिडको वाळूज महानगर -1 येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन गुरुवारी (ता.23) रोजी करण्यात आले होते. या सभेला वाळूज परिसरातील मराठा समाजाने प्रचंड गर्दी केली होती. यावेळी मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या जाती धर्माचा द्वेष करू नका. कोणत्याही नेत्याची हुजरेगिरी न करता आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी एकत्र या. नेत्यामुळे आपल्या लेकराचे कधीही भले होणार नाही. त्यासाठी आरक्षणच महत्वाचे आहे. समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी दिवसरात्र रस्त्यावर आहे. मी माझा सगळा संसार डावावर लावला. आरक्षणासाठी माझा जीव गेला तरी चालेल. समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी एक इंच सुद्धा मागे हटणार नाही. फक्त तुम्ही एकत्र रहा, आरक्षणासाठी सहकार्य करा.
माझा जीव गेला तरी तुम्ही तुटू नका-
माझी प्रकृती बरी नाही, डॉक्टरने मला फिरण्यास मनाई केली आहे. तरीही मी आरक्षणासाठी रस्त्यावर फिरतो. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे, तुमची एकी अतूट ठेवा. माझा जीव गेला तरी मी एक इंच सुद्धा मागे हटणार नाही.
सरकारचा डाव हाणून पाडणार –
माझ्या विरोधात सरकार कोटकारस्थान करणार आहे. वेगवेगळे गुन्हे दाखल करून मला जेलमध्ये किंवा महाराष्ट्र बाहेर तडीपार करण्याचा डाव रचत आहे. मात्र तुम्ही काळजी करू नका, जेलमध्ये टाकले तर मी सर्व मराठा कैद्यांना एकत्र करून तेथेच उपोषण करीन. राज्याबाहेर तडीपार केले तर राज्यातील समाज तिकडे बोलावून तेथे मोर्चे काढील. परंतु सरकारला न घाबरता आरक्षण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारचा डाव हाणून पाडणार.
सभीने रेकॉर्ड मोडला –
मराठा योद्धा मनोज रंगी पाटील यांची वाळूज परिसरात प्रथमच जाहीर सभा झाली. या सभेत जरांगे पाटील यांनी जवळजवळ 45 मिनिट भाषण करून सरकारवर ताशेरे ओढले. आणि मराठा आरक्षणासाठी समाज एकवटला तो आरक्षण मिळेपर्यंत असाच ठेवावा. असे आवाहन केले. मनोज जरांगे पाटील यांच्या गुरुवारच्या सभेने वाळुज परिसरात आजपर्यंत झालेल्या सर्व नेत्यांच्या सभेचा रेकॉर्ड मोडला.
सभेपूर्वी व्याख्यान व पोवाडा –
सिडको वाळूज महानगर येथे झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेपूर्वी शिवव्याख्याते शिवश्री रवी गवारे यांचे व्याख्यान व छत्रपती संभाजी महाराज यांचा पोवाडा झाला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त – मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्यासह 2 पोलीस निरीक्षक, 5 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उपनिरीक्षक व 100 पोलीस कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा समाज वाळुज महानगर 1 छत्रपती संभाजीनगर व आयोजन समिती समन्वयक बाळासाहेब पाथ्रीकर, सुभाष औताडे, संजय आळंजकर, परमेश्वर नलावडे, प्रा. कैलास जाधव, आत्माराम आगलावे, विलास पांगरकर, जनार्दन निकम, प्रल्हाद सूर्यवंशी, संतोष बारगळ, संतोष कुंटे, रामेश्वर चौधरी, बप्पा चौधरी, लक्ष्मण कोरडे, राजू वंजारी, दिनकर पवार, अवचितराव मोरे, शिवराज मिटकरी, राम शिंदे, अमर तरटे, पिंटू घाइट यांनी परिश्रम घेतले.