
वाळूजमहानगर, (ता.13) – वाळूज येथील इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (आयसीम) कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन “जलसा” व आंतरमहाविद्यालयीन कला-उत्सव “आरोहण” शुक्रवारी (ता.10) व शनिवारी (ता.11) रोजी मोठ्या उत्साहात झाला. आयसीमने आयोजित केलेल्या या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये कन्नडच्या शिवाजी कॉलेजने हा स्वातंत्र्य सैनिक विजेंद्र काबरा करंडक पटकावला.
यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय भोसले यांनी हा फिरता चषक स्वीकारला. आयसीम कँपस मधे शुक्रवारी (ता.10) व शनिवारी (ता.11) दोन दिवस चाललेल्या या जंगी मुकाबल्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या तीन जिल्ह्यातून सुमारे शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. वैयक्तिक डान्स, सिंगिंग व पोस्टर प्रेझेंटेशन या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यी विविध वेशभूषेत सहभागी झाले होते तसेच कोरोना काळानंतर शैक्षणिक क्षेत्रात घेण्यात आलेला हा सर्वात मोठा सांस्कृतिक कार्यक्रम ठरला. ‘आरोहण’ नावाने होणाऱ्या या वार्षिक कला-उत्सवाच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री ऐश्वर्या कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती, तर कॉलेज अंतर्गत होणाऱ्या ‘जलसा’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिवाजी दादा बनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
आयसीम कँपस मधे झालेल्या या सोहळ्याने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले व उत्तरोत्तर या उत्सवाची व्याप्ती वाढतच जाईल. असे गौरवोद्गार या प्रसंगी उपस्थित तंत्रशिक्षण सहसंचालक उमेश नागदेवे यांनी काढले. यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयसीम कॉलेजच्या प्राध्यापिका आणि आता आरटीओ कार्यालयात आरटीओ म्हणून रुजू झालेल्या पूजा वानखेडे तसेच गिर्यारोहक योगेश्वरी बोहरे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आयसीम कॉलेजचे अध्यक्ष डॉ. सुभाष झवर, उपाध्यक्ष रमाकांत पूलकुंडवार, सचिव दिलीप सारडा, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सी. एस. पद्मावत, डायरेक्टर डॉ. आर. एस. जहागीरदार, उपप्राचार्य प्रा. हेमंत जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी विकास शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे डाॅ. ज्ञानेश्वर निळ, महावितरणचे गोविंद दुसंगे, प्रणीत खंडागळे, ह.भ.प. नंदू महाराज फांदाडे, प्रा. सायली राठोड, प्रा. विनोद शिखरे, प्रा. मुशाहीद खान, प्रा. शिशिर राठोड, प्रा. जफर हसन, प्रा. सोनम वेळंजकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘आरोहण’ प्रमुख डॉ. दीपमाला बिरादार यांनी केले, सूत्रसंचलन श्री. प्रशांत जोशी यांनी केले तर ‘जलसा’ प्रमुख प्रा. आनंद हुंबे यांनी सर्वांचे आभार मानले.
