
वाळूज महानगर, (ता.15) – वाळूजसह छत्रपती संभाजीनगर शहरात अकरा केंद्राचे नेटवर्क असलेल्या आदर्श मित्र मंडळाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे मोफत पादत्राणे सांभाळण्याचा. वाळूज परिसरातील छोट्या पंढरपुरात भरणाऱ्या आषाढी, कार्तिकी यात्रा उत्सवासह छत्रपती संभाजीनगर शहरातील कर्णपुरा यात्रा येथे हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाला 29 वर्षाची परंपरा आहे. रविवारी (ता.15) पासून या मोफत पादत्राणे सांभाळण्याच्या सेवेला सुरुवात झाली.

छत्रपती संभाजीनगर येथील कर्णपुऱ्यात तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. नवरात्र उत्सवानिमित्त येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त व नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून आदर्श मित्र मंडळाच्या वतीने मोफत पादत्राने सांभाळण्याचा उपक्रम 29 वर्षापासून सुरू आहे. या उपक्रमाचे उद्घाटन रविवारी (ता.15) नवरात्राचा पहिला दिवस छत्रपतीसंभाजीनगर शहराचे आमदार तसेच महाराष्ट्राचे राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब, तसेच कर्णपुरा यात्रेतील पोलीस निरीक्षक सचिन भगवानसिंह मिरधे यांच्या हस्ते करण्यात आले. 
हा उपक्रम बन्शीलालनगर केंद्राच्या देखरेखी मध्ये 15 ते 24 ऑक्टोंबर (विजयादशमी) पर्यंत चालणार आहे. नवरात्रोत्सवात म्हणजेच दहा दिवसात जवळपास एक लाख भक्तांना मंडळाचे कार्यकर्ते मोफत पादत्राणे सांभाळण्याची सेवा देत असतात. या उद्घाटन प्रसंगी आदर्श मित्र मंडळाचे चंद्रकांत कांबळे (उपाध्यक्ष), सत्यविजय देशमुख (सरचिटणीस), ब्रिजलाल बन्सवाल (कोषाध्यक्ष), मारुती आवलगावे (सहसचिव), जितेंद्र कुलकर्णी (सहसचिव), नितीन गवते (उपक्रम प्रमुख), अर्जुनसिंग चव्हाण (उपक्रम प्रमुख), हेमंत दाभाडे, ज्ञानेश्वर गवळी, अमर निकम आदींची उपस्थिती होती.
