February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.5) – रात्र असो वा दिवस, पाऊस असो वा ऊन. मनोज जैन अपघातग्रस्तांच्या मदतीला 24 तास सदैव तत्पर असतात. म्हणूनच वाळूज परिसरात कुठेही अपघात झाला की, नागरिकांचा पहिला फोन जातो तो म्हणजे अपघातग्रस्तांचा खरा देवदूत असलेला अवलिया मनोज जैन यांनाच. मात्र या निस्वार्थ सेवेची कोणी दखल घेईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयडीसी वाळुज महानगर परिसरात अपघातग्रस्तांचा देवदूत म्हणून समाजसेवक मनोज जैन यांची ओळख आहे. मनोज जैन यांनी 2017 पासून अविरतपणे अपघातग्रस्तांना मदत करणे हे कार्य सुरू केले असून आजपर्यंत शेकडो जखमींचे प्राण त्यांच्या तातडीच्या मदतीमुळे वाचले आहेत. अपघातस्थळी वेळेत पोहोचून जखमींना धीर देणे, शासकीय रुग्णवाहिका वेळेवर न आल्यास स्वखर्चाने रुग्णालयात पोचविणे, रक्ताची आवश्यकता असल्यास स्वतः धडपड करून रक्त मिळवून देणे, अशी अनेक उदाहरणे त्यांच्या सेवाभावाची आहेत.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर तडफडणाऱ्या अपघातग्रस्तांना मदत करण्याची ही निस्वार्थ धडपड त्यांना खऱ्या अर्थाने ‘अपघातग्रस्तांचा अवलिया’ ठरवते. परंतु इतकी अमूल्य सेवा करूनही आजतागायत या अवलियाच्या कार्याची कोणीही दखल घेतली नाही, ही खरंच खेदजनक बाब आहे. समाजाच्या हितासाठी स्वतःचा वेळ, पैसा आणि जीवाचीही पर्वा न करणाऱ्या अशा व्यक्तींना प्रशासनाने मान्यता देऊन प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. अशा सेवाभावी व्यक्तींचे कार्यच समाजाला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवते. इतरांना सुद्धा या कार्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी मनोज जैन यांच्या कार्याची तात्काळ दखल घेऊन त्यांचा सन्मान प्रशासनाने करावा. अशी भावना जनमानसातून व्यक्त केली जात आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *