वाळुज महानगर, (ता.5)- आपल्या आयुष्यामध्ये अज्ञानाचे बंधन आहे. आयुष्यामध्ये सर्वात जास्त कोणी त्रस्त असेल, दुःखी असेल तर तो फक्त अज्ञानामुळे. ज्या क्षणाला आपल्या आयुष्यातील अज्ञान निघून जाईल, ज्ञान आपल्याकडे असेल, विवेक असेल, विचार असेल. त्या दिवशी जगातील कुठलीही गोष्ट आपल्याला व्यवस्थित करू शकणार नाही दुःख देऊ शकणार नाही. असा मार्गदर्शनपर संदेश हभप सर्वदर्शनाचार्य विठ्ठल महाराज शास्त्री चनघटे यांनी वाळूज येथे कीर्तनातून दिला.
वाळूज येथील शिवाजीनगर परिसरातील कलानगर येथे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजिt त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी पहिल्या दिवसाचे शुक्रवारी (ता.1) रोजी कीर्तन करताना पिंपरखेडा येथील श्रीराम ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्थेचे हभप सर्वदर्शनाचार्य विठ्ठल महाराज शास्त्री चनघटे यांनी
हा संदेश दिला. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या
सत्य साचे खरें । नाम विठोबाचें बरें ॥ १ ॥
येणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीर्ती जेणें ॥ध्रु.॥
भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥ ३ ॥
तुका म्हणे भोळा । जिंकुं जाणे कळिकाळा ॥४॥
या अभंगावर कीर्तन करून विठ्ठल नामाचे महत्त्व विविध उदाहरणासह समजावून सांगितले. या प्रसंगी वाळूज, रामराई, शिवराई, पिंपरखेडा, शिवाजीनगर परिसरातसह पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन महाराज मंदिर समिती पदाधिकारी परिश्रम घेतले.
