
वाळुज महानगर, (ता.4)- भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने स्कुटी या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात अंदाजे 30 वर्षीय अनोळखी तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहे. हा अपघात बजाजनगर ते साईनगर सिडकोकडे जाणाऱ्या रोडवरील कंदील हॉटेलजवळ रात्री 12 वाजेच्या सुमारास झाला. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अंदाजे 30 वर्षीय अनोळखी तरुण जुबिटर स्कुटी (एमएच 26, बी आर – 2010) वरून जात होता. भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याच्या स्कुटीला जोराची धडक दिली. शनिवारी (ता.3) रात्री 11.50 ते रविवारी (ता.4) रोजी पहाटे 12.15 वाजेच्या दरम्यान झालेल्या या अपघातात तो गंभीर जखमी झाला. बजाजनगरकडून सिडकोच्या अल्प उत्पन्न गट या नागरीवसाहतीकडे जाणाऱ्या रोडवरील कंदील हॉटेल जवळ हा अपघात झाला. मात्र तो बजाजनगरकडे येत होता की, सिडकोकडे जात होता. याबाबत माहिती मिळू शकली नाही. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्या अनोळखी तरुणास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले आहे. तो चालवत असलेल्या स्कुटीच्या क्रमांकावरून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी माहिती काढली असता स्कुटीच्या आरसी बुक वरून त्याचे नाव अच्चुत पंढरीनाथ सावंत असे असल्याचे कळते तो हिंगोली जिल्ह्यातिल असावा असाही पोलिसांचा अंदाज आहे. या अपघाताची नोंद वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार रामचंद्र बिघोत हे करीत आहे.
