वाळूजमहानगर, ता.27 – घर खाली करण्यासाठी बळजबरीने घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करत घरातील सामान बाहेर काढून घेऊन गेले. या घटनेत दोन महिलांसह तीन जणांना मारहाण झाली असून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने गहाळ झाले आहे. सिडको वाळूज महानगर येथे शनिवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आर एच 9, सारा वृंदावन, सिडको गार्डनजवळ वाळूज महानगर-1 येथे अनुराधा जसवंत सिंह (वय 35) या कुटुंबासह 16 वर्षापासून राहतात. हे घर मेवालाल यादव व अंजली यादव यांच्या नावावर आहे. घराचा ताबा अनुराधा सिंह यांच्याकडे असून ताब्या संदर्भात कोर्टात वाद सुरू आहे. शनिवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास त्यांचा दरवाजा खोटवल्याने सिंह यांनी दार उघडले. त्यावेळी आरोपी मेवालाल यादव, अंजली यादव, मनीष राजपूत, कुणाल यादव यांनी अनुराधा यांना दरवाज्यातून ढकलून जबरदस्तीने घरात घुसले. व घरातून निघून जा असे म्हणत शिवीगाळ करत घरातील सामान बाहेर फेकण्यास सुरुवात केली. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हाताचापटाने मारहाण करत घरातील सामान बाहेर काढले. त्यांना दोन अनोळखींनी मदत केली. यावेळी अनुराधा यांचा मुलगा वंश सिंह यांनी वडिलांना फोन लावण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हातातील मोबाईल घेऊन खाली आपटून फोडून नुकसान केले. तसेच घराबाहेर काढलेले सामान गाडीत भरून घेऊन जाताना अनुराधा यांचा दीर घरी आला असता त्यालासुद्धा शिवीगाळ करून मारहाण केली. व जर घर खाली केले नाही तर, जीवे मारून टाकू. अशी धमकी दिली. या घटनेत एका सुटकेस मधील 90 हजार रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने दोन ते तीन लाख रुपये रोख लॅपटॉप प्रिंटर असा ऐवज गहाळ झाला. याप्रकरणी अनुराधा जसवंत सिंह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मेवालाल यादव, अंजली मेवालाल यादव, मनीष राजपूत, कुणाल यादव व दोन अनोळखी अशा 6 जणांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही चित्रीकरण –
दरम्यान अनुराधा यशवंत सिंह यांच्या घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचे चित्रण आले आहे.