वाळूज महानगर, (ता.29) – सकल मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे उपोषणार्थी श्याम बळीराम शेळके म्हणाले. रविवारी (ता.29) रोजी शेळके यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.
वाळूज परिसरातील जिकठाण फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने श्याम बळीराम शेळके यांनी बुधवारी (ता.25) पासून आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी जो 30 दिवसांचा कालावधी मागून घेतला होता.
तो संपला आहे. कोर्टात टिकेल असे आरक्षण मराठ्यांना देऊ. असा सकल मराठा समाजाला जो शब्द दिला होता तो पाळला नाही. म्हणून श्याम शेळके यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने जिकठाण फाटा, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
रविवारी (ता.29) रोजी त्यांची भेट घेतली असता आरक्षण मिळेपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे शेळके यावेळी म्हणाले.