वाळूज महानगर, (ता.26) – दहा दिवस चाललेल्या कर्णपुरा यात्रेत मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने बजाजनगर येथील श्रीनाथ फार्मसी कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला.
स्वच्छतेबद्दल जनजागृती करत 25 ऑक्टोबर रोजी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शेळके, प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव, विनायक बोधनकर, मोनिका माधव यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, उपसचिव अमन जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यात्रेच्या समारोपानंतर कर्णपुऱ्याच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता. तो सर्व कचरा विद्यार्थ्यांनी उचलून परिसर स्वच्छ केला.