वाळूज महानगर, (ता.5) – वाळूज येथील आयसीम इंजिनियरिंग, पाॅलीटेक्निक व एमबीए कॉलेजच्या वतीने सामाजिक दृष्टिकोनातून उद्योग सुरु करणाऱ्या उद्योजकांना दिला जाणारा यंदाचा “विजयेंद्र काबरा स्मृती पुरस्कार” आयसीम वर्धापन दिनाचे औचित्य साधून तुकाराम तांगडे यांना देण्यात आला. सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रुपचे सीईओ शिवप्रसाद जाजू होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गतवर्षीचे पुरस्कार विजेते सिद्धांत तवरावाला, अध्यक्ष डॉ. सुभाष झवर, सचिव दिलीप सारडा, विश्वस्त डॉ. कल्पना झवर, डॉ सचिन झवर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सी. एस. पद्मावत, बबनराव पेरे पाटील, डॉ. गौतम शहा, प्रा. आनंद हुंबे, डॉ. दीपमाला बिरादार, प्रा. मंगल काळे, प्रा. सायली राठोड यांची उपस्थिती होती. कौशल्य विकास अभियानाचे प्रवर्तक म्हणून स्वातंत्र्य सेनानी विजयेंद्र काबरा यांची ओळख आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही मान्यवर मंडळीनी एकत्र येवून आयसीम कॉलेजची स्थापना केली. या कॉलेज मधून शिक्षण घेतलेल्या अनेकांनी आपापले उद्योग सुरू केले आहेत. विद्यमान काळात विद्यार्थ्याना प्रेरणादायी ठरणाऱ्या आणि सामाजिक हेतू ठेऊन उद्योग उभारणाऱ्या नव-उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. मराठवाड्यातील उद्योजक तुकाराम तांगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षकांचा आदर करीत परिश्रम घेणारा विद्यार्थी आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. करियर म्हणजे आठ तासाची नोकरी आणि 24 तासाची नोकरी म्हणजे उद्योग असतो. त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांनी उद्योगाकडे वळले पाहिजे. याप्रसंगी शिवप्रसाद जाजू यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत भोसले यांनी केले तर प्रा. पल्लवी काथार यांनी आभार मानले.