
औरंगाबाद शहराच्या नामांतराची (Aurangabad name change) प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाही राज्याच्या पर्यटन (Maharashtra Tourism) संचलनालयाला औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याची घाई झालेली दिसतेय. पर्यटन संचलनालयाच्या ट्विटर हँडलवर शहराच्या नावाचा उल्लेख करताना संभाजीनगर (Sambhajinagar) असा करण्यात आला आहे. त्यामुळे नामांतर विरोधी नेते आणि संघटनांची तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. राज्याच्या पर्यटन संचलनालयाचे महाराष्ट्र टुरिझम या नावाने ट्विटर हँडल आहे. यावर दौलताबाद अर्थात देवगिरी किल्ल्याची माहिती देताना औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. शहरातील अनेक खासगी आस्थापनांनी तर विविध ठिकाणी संभाजीनगर असा उल्लेख करणे सुरु केले आहे. मात्र सरकारी विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही पूर्ण नामांतर प्रक्रिया झालेली नसताना अशा प्रकारे उल्लेख केल्याने विविध समाज आणि संघटनांचा रोष ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.