वाळूज महानगर (ता.19) :- आनंद नगरीमुळे विद्यार्थ्यांना अगदी बारीक सारीक गोष्टीचे नियोजन करणे शिकता येते. जसे स्टॉलचे भाडे, खाऊ बनवण्यासाठी साधन सामग्री जमा करून त्या साधनसामग्रीचे चौकसपणे किंमत ठरवणे. कच्चामालाचे योग्य भाव करणे, तसेच बनवलेल्या पदार्थ विकण्यासाठी योग्य ती मार्केटिंग करणे तसेच जमा खर्चाचे ताळमेळ करणे व नफा ठरवणे या सर्व बाबीमुळे विद्यार्थ्यांचा कल व्यापारी व उद्योजक बनण्याकडे वळतो त्यामुळे आनंदनगरीला विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. त्यामुळे यातून एक प्रकारे विद्यार्थ्यांना व्यापारी उद्योगपती बनवण्यासाठी प्रेरणा दिली आहे. असे प्रतिपादन इप्का कंपनीचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख व्यंकट मैलापुरे यांनी केले.
रांजणगाव (शेणपुंजी) येथील शहीद भगतसिंग हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक ज्ञानासह कलागुणांना वाव मिळावा. याकरिता आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका भारती साळुंखे या होत्या. तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक इप्का कंपनीचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख व्यंकट महिलापुरे, सचिव हर्षीत पाटील, डोणगावकर शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी बोडखे, संस्थेचे संचालक नानासाहेब हारकळ, अक्षय हरकळ, विष्णुदास पाटील, फेरोज पठाण आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मान्यवर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून पालकांनी सढळ हाताने या आनंद नगरीत खर्च करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे. असे आवाहन केले. तर शिवाजीराव बोडखे यांनी या आनंदनगरीतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा वाव मिळतो व त्यातून भविष्याचे व्यापारी निर्माण होतात. असे सांगितले. कार्यक्रमाचे सुञसंचलन वाहेद पठाण यांनी केले तर आभार संजय काळे यांनी मानले.