वाळूज महानगर – भरधाव जाणाऱ्या एका छोटा हत्ती चालकाने दुचाकी स्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. शिवाय त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले. वाळूज येथील लांझी चौकात 19 ऑक्टोंबर रोजी झालेल्या या अपघाता प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात फरार छोटा हत्तीच्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकाश सुर्यकांत धामणे (24), रा.सारोळा कासार, जि. नगर) हा युवक दुचाकी 19 ऑक्टोंबर रोजी (एमएच 16, एस -9261) वरुन वाळूजकडून नगरकडे चालला होता. तो वाळूज येथील लांझी चौकात आला असता भरधाव येणार्या छोटा हत्ती (टाटा एस) (एमएच 20, सीटी-9924) च्या चालकाने आकाश धामणे याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरुन पडल्याने आकाश धामणे हा गंभीर जखमी झाला. यात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान छोटा हत्ती चालक वाहनासह अपघातस्थळावरून फरार झाला. या प्रकरणी जखमी दुचाकीस्वार आकाश धामणे याचे वडील सुर्यकांत धामणे यांच्या फिर्यादीवरुन फरार छोटा हत्ती चालकाविरुध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.