वाळूजमहानगर – सण उत्सवानिमित्त अनेक जण घराबाहेर गावी किंवा खरेदीसाठी जातात. त्यामुळे घर बंद असते. याचा फायदा घेत चोरी, घरफोडी होते. तसेच एकटी, दुकटी महिला रस्त्याने जात असल्याचे पाहून मंगळसूत्र, सोनसाखळी, गंठण हिस्कावण्याचे प्रकार घडतात.
त्यामुळे निष्काळजीपणा न करता जागरूकता बाळगा, सावध रहा. व कोणी संशयित आढळल्यास पोलिसांना तात्काळ कळवा. असे आवाहन वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी केले.
वाळुज एमआयडीसी हा परिसर कामगारांचा आहे. येथे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यासह अनेक राज्यातील कामगार राहतात. मात्र दिवाळी सणानिमित्त ते आपापल्या गावी जातात. त्यामुळे घर बंद असते, परिणामी चोऱ्या, घरफोड्या होतात. म्हणून गावी जाताना काळजी घ्यावी. मौल्यवान वस्तू घरात ठेवू नये. शेजाऱ्यांना सांगून बाहेरगावी जावे. जेणेकरून चोरी घरफोडी होणार नाही. तसेच आपली दुचाकी लॉक करून सुरक्षित ठेवावी.
एकट्या दुखट्या महिलांनी रस्त्यावर फिरू नये. जास्त सोने घालून गर्दीत फिरू नये, खरेदीसाठी बाजारात गेल्यास आपले दागिने व पैसे संभाळा. बेवारस वस्तूंना हात लावू नये, कोणी संशयित आढळल्यास तात्काळ पोलिसांना खबर करावी, अफवावर विश्वास ठेवू नये. अशा मार्गदर्शक सूचना वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी केल्या.