वाळूजमहानगर – बहिणीच्या प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यात व्यवस्थित साक्ष न दिल्याच्या कारणावरून एकावर गावठी कट्ट्यातुन गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (ता.14) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूर येथे घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळुज परिसरातील हनुमाननगर, कमलापूर येथील सागर सुभाष सदार वय अंदाजे 25 हा आरोपी गजा मोरे याच्या बहिणीच्या आत्महत्या प्रकरणात साक्षीदार होता. दरम्यान सागर याने व्यवस्थित साक्ष न दिल्याने बहिणीचे आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटले. या कारणावरून गजा मोरे व त्याच्या चार ते पाच साथीदाराने शुक्रवारी (ता.14) रात्री साडेआठच्या सुमारास सागर सदार याला कमळापूर फाट्यावर अडवले. यावेळी त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने गजा मोरे याच्यासोबतच्या साथीदारांनी सागरला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी गजा याने सागरवर गावठी कट्ट्यातुन सुमारे चार ते पाच गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सागरच्या उजव्या बरगडीत लागली. त्यामुळे सागर गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी उपचारार्थ तात्काळ घाटीत दाखल केले. या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.