वाळूज महानगर – रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारात घाटीत दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे. हा अपघात मंगळवारी (ता.11) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास वाळूज पोलीस ठाण्याजवळ झाला.
अण्णाभाऊ साठेनगर, वाळूज येथील जाकेराबी कासम शेख (वय 61) ही वृद्ध महिला मंगळवारी (ता.11) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास लायननगर येथे नातवंडाना भेटण्यासाठी जात होती. वाळूज पोलिस ठाण्याजवळून औरंगाबाद पुणे महामार्ग ओलांडत असतांना औरंगाबादकडून पुण्याकडे भरधाव जाणार्या कंटेनर (एच आर 55, ए जे -8002) च्या चालकाने जाकेराबी शेख यामहिलेला जोराचीे धडक दिली.
नागरिकांची वेळीच धाव –
वाळूज पोलीस ठाण्याजवळ झालेला हा अपघात नागरिकांसमोरच झाल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कंटेनरखाली अडकून गंभीर जखमी झालेल्या जाकेराबीला बाहेर काढुन आरेफ शहा यांच्या रिक्षातुन उपचारार्थ घाटीत दाखल केले. वाळूज पोलिसांनी कंटेनरसह चालकास ताब्यात घेतले आहे. या अपघाताची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले करीत आहे.
उड्डाणपुलाची अत्यंत गरज –
वाळूज गावामधून औरंगाबाद पुणे हा महामार्ग जातो. त्यामुळे वाळूज गावाचे दोन भाग झाले असून अर्धे गाव महामार्गाच्या अलीकडे तर अर्धे गाव पलीकडे आहे. या महामार्गावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय महामार्गाच्या दोन्हीही बाजूने बाजारपेठ व शाळा आहे. त्यामुळे वाळुज येथील मुख्य महामार्गावर वर्दळ वाढली आहे. सकाळ, सायंकाळ तर येथे गर्दीच गर्दी दिसून येते. परिणामी या गर्दीतून रस्ता ओलांडणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. येथील वर्दळ लक्षात घेता या ठिकाणी उड्डाणपूल अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे वाळूज येथे तात्काळ उड्डाणपूल उभारून नागरीकांसह विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी. अशी मागणी होत आहे.