शेंदूरवादा : वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या शेंदूरवादा येथील मध्वमुनेश्वर महाराज मठातील राधेच्या मूर्तीचा तपास लागलेला नसतानाच याच मठातून श्रीकृष्णाचीही मूर्ती चोरीला गेल्याचे गुरुवारी (ता.6) रोजी पहाटे उघडकीस आले. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेंदूरवादा (ता.गंगापूर) सोळाव्या शतकातील महाराष्ट्राच्या संत परंपरेतील पांडुरंगाचे निस्सिम भक्त असलेले मध्वमुनेश्वर महाराज यांच्या नित्य पूजेतील व सध्या मध्वमुनेश्वर समाधी मंदिराच्या बाजूला असलेल्या चारशे वर्षापूर्वीची पुरातन श्रीकृष्ण मूर्ती बुधवारी (ता.चार) रात्री चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गुरुवारी पहाटे ग्रामस्थ पूजेसाठी गेले असता मूर्ती चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी इतर ग्रामस्थासह पोलीस ठाण्याला कळवले माहिती मिळतात वाळूज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, संदीप शेवाळे, सलीम शेख यांनी पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेतली, श्वान पथकालाही प्राचारण करण्यात आले. परंतु श्वान पथकाकडून कुठलाही माग मिळाला नाही. चोरीचा प्रकार वेगवेगळे बारकावे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरातील चोरी शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
वीसपंचवीस वर्षांपूर्वी राधेच्या मूर्तीची चोरी –
या ठिकाणी पूर्वी राधा आणि कृष्ण अशा वेगवेगळ्या दोन मुर्त्या स्थापित होत्या परंतु मागील वीस पंचवीस वर्षांपूर्वी या ठिकाणातील राधेची मूर्ती चोरट्यानी चोरून नेली होती त्याचा अद्याप कुठलाही शोध लागला नसल्याने पुन्हा कृष्णाची मूर्ती चोरी गेल्याने भाविक अस्वस्थ झाले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद –
ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी एका भाविकांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते परंतु व्यवस्थापक मंडळीच्या दुर्लक्षपणामुळे सदरील कॅमेरे बंद असून त्यामुळे रात्रीचा चोरटा त्याच्यात कैद झाला नसल्याने चोरटा शोधण्याचे आव्हान ग्रामस्थासह पोलिसासमोर उभे टाकले आहे.