वाळूजमहानगर – अज्ञात चोरट्यांनी धुमाकुळ घालत तीन घरे फोडून किरकोळ ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मात्र दक्ष नागरिकांनी पाठलाग केल्याने एक दुचाकी सोडून चोरटे अंधारात फरार झाले. ही चोरीची घटना साजापूर शिवारात सोमवारी (ता.3) रोजी मध्यरात्रीनंतर घडली.
वाळूज परिसरातील साजापूरच्या क्रांतीनगरात सोमवारी (ता.3) मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रफुल्ल गणपत पाटील यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील 3 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या, रोख 4 ते 5 हजार रुपये असा ऐवज चोरी केला. त्यानंतर शेजारील पतींगराव विनायक पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र चोरटे आल्याची चाहुल लागताच पाटील यांनी आरडा-ओरडा केल्याने चोरटे पसार झाले. नंतर शिंदे यांच्या घरात तसेच महादेव मंदिरातील दानपेटीही पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री नवरात्र उत्सवात महाप्रसादाची तयारी करत असलेल्या आदीनाथ भुमे, बाबासाहेब जाधव, रेवनाथ भुमे, गजानन पाटील, राजेंद्र शिंदे, हेमंत देवरे, पोपट ससाणे आदींनी चोरट्यांचा पाठलाग केला. त्यामुळे
पकडले जाण्याच्या भितीने चोरटयांनी दुचाकी ( एम.एच.20, सी.एन.-9250) सोडून अंधारात पसार झाले.
चोरट्यांमध्ये महिलांचा सहभाग –
दरम्यान या घटनेतील चोरट्यांचे चित्र सीसीटीव्ही कॅमेरात आले असून त्यांच्या हातात तलवारी असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या चोरट्यांच्या टोळीत महिलाही असल्याचे दिसते. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार पाच ते सहा चोरटे होते. या परिसरात चोरीच्या घटना सतत घडत असल्याने पोलिस चौकी उभारण्यात यावी. अशी मागणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात त्रस्त नागरिकांनी निवेदन देऊन केली आहे.