वाळूजमहानगर – जिकठाण शिवारात सोमवारी (ता.3) रोजी सायंकाळी एका 58 वर्षीय महिलेला एकटी गाठून तिला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच तिच्या अंगावरील दागदागिने व पिशवीतील रोख रक्कम असा ऐवज बळजबरीने हिसकावून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन फरार झालेल्या आरोपीच्या 24 तासाच्या आत मुजक्या आवळून जेरबंद केले.
याबाबत पोलिसांनी मिळालेली माहिती अशी की, जिकठाण येथील 58 वर्षीय महीला सोमवारी (ता.3) रोजी अंबाड्याची भाजी आणण्यासाठी शेतात गेली होती. ती एकटीच असल्याचे पाहून आरोपीने तिला चाकूचा धाक कपाशीच्या शेतात तिच्यावर बलात्कार केला. तसेच बेदम मारहाण करून तिच्या कमरेच्या पिशवीतील पैश्यासह 16 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून फरार झाला. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेली ही महिला गावात आल्यानंतर मोठा जमाव जमला. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेला पाचारण केल्याने पायलट राजू रोकडे यांनी या जखमी महिलेला प्रथम वाळूज पोलीस ठाण्यात व नंतर घाटीत दाखल केले. या प्रकरणी पीडीत महिलेच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके करीत आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी भेट देऊन पाहणी करत तपासकामी सूचना दिल्या.त्यानंतर वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी आरोपीच्या सापडलेल्या मोबाईल मधून त्याचा नाव व पत्ता मिळवला आणि शोध मोहीम सुरू केली. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील आरोपी शकतूर लक्ष्याहरी भोसले रा.गाजगाव याला वाळूज परिसरातील एकलहेरा गावाजवळ पकडून मंगळवारी (ता.4) रोजी वाळूज पोलिसांच्या हवाली केले. अवघ्या 24 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवळून जेरबंद केल्याने वरिष्ठांकडून त्यांना नक्कीच शाबासकी मिळेल यात शंका नाही.