वाळूजमहानगर – नळाला पाणी आल्याने घरगुती विद्युत पंप सुरू करताना विजेचा शॉप लागून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना घाणेगाव येथे दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील घाणेगाव येथील संघर्षनगर , भीलवस्ती येथे अमोल भीमराव जाधव (वय 30) हा कुटुंबासह राहतो. सार्वजनिक नळाला पाणी आल्याने तो रविवारी (ता.25) रोजी घरगुती विद्युत पंप सुरू करत होता. त्यासाठी विद्युत बोर्डात तो तीन लावत असताना त्याला विजेता जबरदस्त शॉक लागला. यात तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला भाऊ दादासाहेब जाधव यांनी बेशुद्ध अवस्थेत घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी घाटीतून आलेल्या माहितीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रामचंद्र बिघोत करीत आहे.
वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच अंत –
अमोल भीमराव जाधव याच्या पुतण्याचा आज वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या घरगुती कार्यक्रमाला पाणी भरण्यासाठी तो विद्युत पंप सुरू करत होता. मात्र वाढदिवस साजरा करण्यापुर्वीच अमोल जाधव याचा अपघाती मृत्यू ओढवला. यामुळे वाळूज परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.