वाळूजमहानगर – राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बजाजनगर येथील बारावी विज्ञान शाखेतील रोहन दशरथ कदम या विद्यार्थ्याने जेईई ॲडव्हान्स परीक्षेत 209 गुण मिळवून देशात, ऑल इंडिया रँक 300 वा क्रमांक मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली. त्याचबरोबर बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आदित्य लिमकर, शाहबाज पठाण हे विद्यार्थी सुद्धा जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले.
या निकालामुळे देशातील नामांकित आयआयटी कॉलेजला त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. यापूर्वी सुध्दा रोहन कदम या विद्यार्थ्याने जेईई मेन परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवत देशात 131 वा क्रमांक घेत यशाची खात्री दिली होती. तसेच रोहन कदम याने एन.टी.एस.सी. व के.व्ही.पी.वाय. या परीक्षा तो उत्तीर्ण झाला. प्रचंड इच्छाशक्ती व मेहनत, नियमित अभ्यास आई-वडिलांचा विश्वास व कॉलेजमधील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे मी हे यश मिळवू शकलो. असे रोहन कदम सांगतो. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ.एस.एस.कादरी, विभागप्रमुख जयश्री शेजुळ, अनिता बोबडे, माधुरी बहिरट, प्रशासकीय अधिकारी बी.बी.जाधव यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक तसेच वडील दशरथ कदम व आई यांनी रोहन कदम याचे स्वागत केले.